लातूर जिल्ह्यातील आरोग्य निर्देशांकाच्या रँकमध्ये राज्यात पुन्हा प्रथम क्रमाकावर
लातूर(जिमाका) – सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत आरोग्य संस्थाच्या कामाचा गुणवत्तेनुसार जिल्ह्याचा गुणाणुक्रम (रॅकींग)राज्यस्तरावरुन करण्यात येत असून साधारणत: माहे जून 2022 पासून ही रॅकिंगची पध्दत सुरु करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, लातूर हे माहे फेब्रुवारी, 2023 मध्ये रँकिंगमध्ये राज्यात पुन्हा प्रथम क्रमांक करण्यामध्ये यशस्वी झाले आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
लातूर जिल्ह्यातील आरोग्य संस्थामध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची गुणवत्ता वरचेवर उत्कृष्ट दर्जाची होत आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मणराव देशमुख यांच्याकडून कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अधिनस्त आरोग्य संस्थेतील अधिकारी ,कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यामध्ये जिल्हास्तरावर साधारणत: रॅकिंगचे तीन स्तर करण्यात आले आहेत. 1) जिल्हा आरोग्य अधिकारी स्तर, 2) जिल्हा शल्य चिकित्सक स्तर, 3) वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका स्तर अशा प्रकारे प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या अधिनस्त आरोग्य संस्थामधील आरोग्य सेवांच्या गुणवत्तेच्या आधारे राज्यस्तरीय गुणाणुक्रम ठरविण्यात येतात.
यामध्ये राष्ट्रीय कार्यक्रमाच्या सर्व महत्वाच्या म्हणजे माता आरोग्य, बाल आरोग्य, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम,राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम, लक्ष्य व कायाकल्प कार्यक्रम, रुग्णालयीन सेवा, लेखाविषयक व आस्थापनाविषयक बाबी इ. कार्यक्रमांच्या महत्वाच्या निर्देशांकाच्या कामाच्या गुणवत्तेच्या आधारे प्रत्येक निर्देशांकास राज्यस्तरावरुन ठरवून देण्यात आलेल्या नॉर्मनुसार मार्क देण्यात येतात. सदरील मार्काच्या आधारे प्रत्येक जिल्ह्याचे तीनही स्तराचे वेगवेगळे रॅकिंग (Numbering) करण्यात येते.
राज्यस्तरावरुन माहे जून, 2022 पासून वरील निर्देशांकानुसार सुरु करण्यात आलेल्या रॅकिंगमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक लातूर या कार्यालयास माहे ऑक्टोंबर, 2022 मध्ये व्दितीय क्रमांक , माहे नोव्हेंबर, 2022 मध्ये तृतीय व माहे डिसेंबर, 2022 मध्ये राज्यात प्रथम , माहे जानेवारी 2023 मध्ये व्दितीय तर माहे फेब्रुवारी 2023 मध्ये पुन्हा जिल्हा शल्य चिकित्यक स्तरावरील रॅकिंगमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करण्यात जिल्ह्याला यश मिळाले आहे.