शरद पवार यांनी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर राज्यासह देशाच्या राजकारणातही एकच खळबळ उडाली. पवार यांचा अचानक राजीनामा हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. याचमुळे पायउतार होण्याच्या घोषणेमुळे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भावूक झाले. तसेच पवारांनीच अध्यक्षपदावर काय राहावं असा आग्रही धरला जात आहे. राष्ट्रवादीमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. पवारांनी अध्यक्षपद सोडू नये यासाठी राज्यभरात पदाधिकाऱ्याचे राजीनामे सत्र सुरू आहेत.
याचवेळी पवारांच्या राजीनाम्यानंतर राजकीय क्षेत्रात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. याचवेळी राहुल गांधी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन करत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत सुरु असलेल्या घडामोडींवर चर्चा केली आहे. राहुल गांधी यांनी सुळे यांच्याशी फोनवरुन संवाद साधताना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत आपली भूमिका मांडली. गांधी यांनी यावेळी पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा. त्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंतीही गांधी यांनी केली. यावेळी शरद पवार यांच्या असा अचानक राजीनाम्यामागचं कारण देखील जाणून घेतलं. गांधी यांच्यासोबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही सुळे यांना फोन केला असल्याचं बोललं जात आहे.