• Wed. Apr 30th, 2025

सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील ३४ नागरिक भारतात दाखल

Byjantaadmin

May 4, 2023

नवी दिल्ली: सुदानमधील गृहयुद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू करण्यात आले आहे.  या मोहिमेअंतर्गत रात्री 12.00 वाजता  दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लष्कराच्या विशेष विमानाने 328 भारतीय नागरिकांची विसावी तुकडी  भारतात परतली.  यात महाराष्ट्रातील  34  नागरिकांचा समावेश आहे.

सुदान येथुन परत आणलेल्या नागरिकांना राज्य शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे स्थापन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून सुखरूप स्वगृही पाठविण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी  आयुक्त नीवा जैन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदनाचे अपर निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार  हे या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र सरकारसमवेत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.

सहकार्य कक्षाद्वारे असे सुरु आहे कार्य…

दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी कक्षाद्वारे समन्वयाचे कार्य होत आहे. विमानतळावर स्थापन करण्यात आलेल्या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या नागरिकांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे.

सुदानमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील नागरिकांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहोचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed