राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अन्य कुणाकुणाची पदं बदलणार, नक्की कुणाला महत्त्वाची जबाबदारी मिळणार तर कुणाला अडगळीत टाकलं जाणार, याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे. कारण जो कुणी नवा किंवा नवी अध्यक्ष होईल, त्या व्यक्तीकडून पक्षात मोठे बदल करणं अपेक्षित असेल. कारण लोकसभा निवडणुकीला एक वर्षंही राहिलेलं नाही. विधानसभेची निवडणूक दीड वर्षांवर आली आहे. तर चारच महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमके कोणते आणि किती खोलवर बदल होतात ते आता पाहावं लागेल.
pawar आपला निर्णय कायम ठेवला तर राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण? हा प्रश्न सध्या सर्वांच्याच मनात आहे. शरद पवारांनी काल निवृत्तीचा निकाल जाहीर केल्यानंतर अनेक बडे नेते आणि उद्योजकांचे फोन आले, त्यांनाही पवारांनी ते या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. तसेच, अध्यक्षपदाबाबत निर्णय कायम ठेवल्यास शरद पवारांनी राष्ट्रवादी समोर दोन पर्याय ठेवल्याची माहिती मिळत आहे. सध्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोक माझे सांगाती सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आणि कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. सारेचजण निर्णय मागे घेण्यासाठी शरद पवारांची मनधरणी करत असल्याचं पाहायला मिळालं. तसेच, काल कार्यकर्त्यांकडून अध्यक्ष शरद पवार आणि पक्षात कार्याध्यक्ष नेमावा, असा पर्याय सुचवला होता. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना आहे, त्यामध्ये अजुनही कार्याध्यक्ष पदाची निर्मिती झालेली नाही, या पदाची नव्यानं निर्माती करावी लागणार आहे. त्यामुळे पवारांनी आपला निर्णय कायम ठेवला तर सुप्रीया सुळे किंवा प्रफुल्ल पटेल या दोघांपैकी एकजण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान होईल, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर येत आहे.
शरद पवारांनी राजकारणाची सुरुवात केलेल्या काटेवाडीतील ग्रामस्थांना काय वाटतंय?
शरद पवारांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात पुण्यातील काठेवाडी गावातून केली होती. साठ वर्षांच्या यशस्वी राजकारणानंतर त्यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार जर निवृत्तीचा निर्णय कायम ठेवणार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदी अजित पवारांनी नेमणूक करण्यात यावी, अशी इच्छा काटेवाडीतील ग्रामस्थांनी एबीपी माझाशी बातचित करताना बोलून दाखवली आहे.
दरम्यान, शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केल्यावर राष्ट्रवादीत बैठकांचा सिलसिला जोरात सुरू आहे. काल (मंगळवारी) संध्याकाळी वाय. बी. सेंटरवर अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि अन्य वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर काही वेळानं सिल्व्हर ओकवर पुन्हा महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. आजही बैठकांचा सिलसिला सुरूच राहणार आहे.