• Wed. Apr 30th, 2025

भाजप ‘मिशन २०२४’ साठी सज्ज; १२०० जणांची जम्बो प्रदेश कार्यकारिणी आज जाहीर होणार

Byjantaadmin

May 3, 2023

भाजप ग्रामपंचायत ते लोकसभा अशी कोणतीही निवडणूक असो विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावते. त्यांच्या आजपर्यंतच्या मिळालेल्या विशाल यशामागं चपखल नियोजन आणि अपयशाचं तात्काळ आत्मपरीक्षण ही कारणं असल्याचं अनेकदा बोललं जातं.याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. याचदरम्यान,आता भारतीय जनता पार्टीची नवीन प्रदेश कार्यकारिणी बुधवारी (दि. 3 ) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे

भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी १२ ऑगस्ट २०२२ ला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याकडून सातत्यांन महाराष्ट्रातील विविध भागांचे दौरे, बैठका, भेटीगाठी,यांचा धडाका लावला आहे. प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर भाजपच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा अपेक्षित होती. पण त्याला मुहूर्त मिळत नव्हता. अखेर आता भाजपनं मिशन २०२४ डोळ्यांसमोर ठेवून नवीन जम्बो कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार आहे.

राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्यातील नेते, प्रमुख नेतृत्व, विशेष निमंत्रित या सर्वांची मिळून जवळपास १२०० जणांची टीम होणार आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.या कार्यकारिणीच्या माध्यमातून २०२४ च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज असणार आहोत. त्यात ४८ लोकसभा आणि २०० हून अधिक विधानसभा युतीत जिंकण्याचा निर्धारही बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

बावनकुळे काय म्हणाले ?

जुनी आणि नवीन कार्यकारिणी मिळून आम्ही २०२४ च्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणार आहोत. त्यात आम्हांला चांगलं यश मिळेल असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. तसेच २८८ विधानसभा समन्वयक देखील लवकरच जाहीर करणार. नव्या जिल्हाध्यक्षांची टीम सुद्धा मे महिन्याच्या अखेरपर्यंत सज्ज होईल. साधारणत: मे महिन्याच्या अखेरपर्यंत संघटनात्मक बदल पूर्ण करण्याचा निर्णय पक्षानं घेतलेला असल्याचंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.

त्यांच्या नेतृत्वाचाही आदर …

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पक्ष संघटनेतील स्थानावरही मोठं भाष्य केलं. बावनकुळे म्हणाले,जनसंघापासून ते भाजपाच्या निर्माणापर्यंत ६० ते ६५ वर्षे वयाचे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाचाही आदर करत आहोत. जुने नवे असे सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही काम करत आहोत असेही बावनकुळेंनी यावेळी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed