आपल्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या लिंगायत
समाजासोबत आयुष्यभर राहू : आ. अभिमन्यू पवार
लातूर : आपल्या पाठीशी सुरुवातीपासूनच भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या वीरशैव लिंगायत समाजासोबत आपण आयुष्यभर राहण्यास तयार आहोत,अशी ग्वाही औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली.
वीरशैव युवा सेवाभावी संस्था व लिंगायत समाज संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन आ. पवार यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. हा मेळावा शाम मंगल कार्यालय, सावेवाडी लातूर या ठिकाणी संपन्न झाला. मेळाव्यासउत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सूर्यप्रकाश धूत, मुंबईचे अभियंता राचोटी स्वामी, हैदराबादचे उद्योजक शंकरप्पा नागशेट्टी पाटील, अनिल मुळे , राजकुमार हुडगे, सुरज पोस्ते, औश्याचे सुभाषप्पा मुक्ता, सुभाष जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पूर्वीच्या काळी विवाह जमविण्याच्या पद्धती वेगवेगळ्या होत्या. अगदी पाळण्यातही विवाह जुळवणी केली जात असे. आता बदलत्या कालमानानुसार यामध्ये अधिकाधिक सुधारणा होत गेल्या. अशा प्रकारच्या वधू – वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून एकाच छताखाली एकापेक्षा अधिक स्थळे पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे सांगून आ. अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की, बाराव्या शतकात म्हणजे शाहू – फुले -आंबेडकरांच्याही फार अगोदर महात्मा बसवेश्वरांनी भेदभाव विरहित समाज निर्मितीचे महान कार्य केले आहे. आंतरजातीय विवाहाची सुरुवातही त्यांनीच केली. विवाह सोहळ्याच्या माध्यमातून केवळ लग्ने पार पाडली जातात,असे नसून त्यामुळे दोन परिवार , समाज एकत्रित येण्यास मदत होते. या वधू – वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटनास मला निमंत्रित केल्याबद्दल अत्यंत समाधान वाटत आहे. लिंगायत समाजातील २० टक्के मतदारांनी विधानसभा निवडणुकीत मला मतदान केल्याने मी भरघोस मतांनी निवडून येऊ शकलो, असे सांगून आपल्या पतीशी भक्कमपणे राहणाऱ्या या समाजसोबत आपण आयुष्यभर राहू,असेही आ. पवार यांनी बोलून दाखविले .
मेळाव्याचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात या मेळाव्यास केवळ लातूर जिल्हा वा महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेजारच्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगाणा राज्यातूनही वधू – वर उपस्थित झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. स्त्री – पुरुष समानतेचा संदेश देणाऱ्या या मेळाव्यात उप वधू – वरांना त्यांच्या आवडीप्रमाणे याद्या तयार असल्याने वेळेची बचत होते असे सांगितले. पूर्वीच्या काळी लिंगायत समाजाचे विवाह स्वामी जमवत असत. आता काळ, परिस्थिती बदलली आहे. बदलत्या काळानुसार विवाह जुळविण्याच्या पद्धतीही बदलत गेल्या आहेत. त्याचा समाजाला फायदाही होतोय,असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक वीरशैव लिंगायत समाज संस्थेचे अध्यक्ष रामलिंगप्पा ठेसे यांनी केले. मेळाव्याचे यावर्षीचे अध्यक्ष राजाभाऊ राचट्टे यांनी आपल्या मनोगतात अठरा वर्षांपासून चालणाऱ्या या मेळाव्याविषयी सविस्तर माहिती देऊन या मेळाव्याचे महत्व, आवश्यकता याविषयी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवकांत स्वामी गुरुजी, प्रा. सुवर्णा कारंजे, प्रा. वनिता पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन सतीशप्पा खेकडे यांनी केले.
याप्रसंगी प्रा. उमाकांत होनराव , उपाध्यक्ष बसवंतप्पा भरडे, पुष्पराज खुब्बा, सतीशप्पा खेकडे, भीमाशंकर अंकलकोटे, शिअभिजित चौंडा, ओंकारप्पा पंचाक्षरी, सागर मांडे, मेळाव्याचे स्वागताध्यक्ष एड. गंगाधरअप्पा हामणे, कार्याध्यक्ष माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, सचिव सुरेश दोशट्टी, केदार रासुरे , गुरुप्रसाद येरटे, प्रा, मन्मथ पंचाक्षरी, भालचंद्र मानकरी, ज्योतीताई सोनटक्के, विश्वनाथ सोरटे, बसवेश्वर हलकुडे , कृष्णा स्वामी, महेश कौळखेरे , मल्लिकार्जुन सोळसे, डॉ. अरविंद भातांब्रे, प्रा. ओमप्रकाश झुरुळे , प्रा. भालचंद्र येडवे , राजाभाऊ खेकडे यांसह विविध ठिकाणाहून आलेल्या वधू – वर, पालकांची लक्षणिय उपस्थिती होती.