OSMANABAD जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत (Tanaji Sawant) आणि तुळजापूर भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होतांना दिसत नाहीये. सध्या राज्यातील सत्ता पक्षात असलेल्या या दोन्ही नेत्यांमधून मात्र विस्तव देखील जात नाही. याचा प्रत्यय पदोपदी येत असतो, आज देखील याची झलक पहायला मिळाली.महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील आमदारांची बैठक बोलावली होती. यावेळी सांवत यांच्या बैठकीला तीन आमदार हजर होते, पण RANA PATIL यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. राणा पाटील बैठकीला गैरहजर राहिले म्हटल्यावर सावंतांनी देखील त्यांच्यावर कुरघोडी करण्याची संधी हेरली.
सावंत यांनी राणा पाटलांचे विरोधक मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांना बैठकीचे निमंत्रण धाडले आणि ते तातडीने बैठकीत हजरही झाले त्यामुळे सावंत यांनी राणा पाटलांना पुन्हा एकदा डिवचल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. बैठक आमदारांची असतांना केवळ राणा पाटील न आल्याने त्यांना डिवचण्यासाठीच सावंत यांनी सुनिल चव्हाण यांना बैठकीला बोलावून घेतले.चव्हाण यांच्याबद्दल एवढे प्रेम दाखवण्यामागे राणा पाटील यांच्यावर कुरघोडी करण्यासाठीच सावंतांनी ही खेळी केल्याचे बोलले जाते. या अगोदरही प्रा.सावंत व राणा पाटील यांच्यामध्ये लेटर बाँम्बमुळे संघर्ष झडला होता. नंतर हा वाद विकोपाला गेला आणि या दोन नेत्यांमधील संघर्ष अधिकच चिघळल्याचे पहायला मिळाले. सावंत यांनी राणा पाटील यांच्याविरुद्ध लढलेल्या मधुकरराव चव्हाण यांच्याबरोबर देखील दिलजमाई केल्याचे चित्र या निमित्ताने समोर आले आहे.
नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये सावंताच्या पुढाकाराने आठपैकी सात ठिकाणी भाजपबरोबर युती झाली. पण तुळजापूरमध्ये सावंत गटाच्या देवानंद रोचकरी यांचे स्वतंत्र पॅनेल उभे करण्यात आले होते. यात राणा पाटील यांनी विजय मिळाला असला तरी चार जागा विरोधी गटाच्या ताब्यात गेल्या. शेवटी सावंत व राणा पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष अजुन किती टोकाला जाणार? हे पाहावे लागणार आहे.