ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 29 एप्रिलच्या रात्री मोहित कंबोज यांनी मद्यधुंद अवस्थेत पोलिसांशी वाद घातल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसंच पोलिसांना हिंमत असेल तर बाहेर काढून दाखवा असं धमकावल्याचा दावा केला आहे. बॉलिवूड संगीतकार ए आर रहमान (AR Rehman) यांच्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केल्याचा उल्लेख करत संजय राऊत यांनी सर्वांना कायदा समान असल्याचं म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं पत्र ट्विटरला शेअर केलं आहे. दरम्यान ट्वीट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “पुणे पोलिसांनी वेळमर्यादा ओलांडल्याने ऑस्कर विजेता ए आर रहमानचं कॉन्सर्ट मध्यातच रोखलं. पण दुसरीकडे भाजपाता एक नेता मुंबईतील बारमध्ये मध्यरात्री 3.30 वाजेपर्यंत डान्स करतो. देवेंद्र फडणवीसजी कायदा सर्वांना समान नाही का? की तुमचे नेते कायद्यापेक्षा मोठे आहेत?”.
Pune Police stop Oscar award winner #ARRahmanconcert midway for exceeding time limit.
But,
On the other hand One Mumbai BJP leader dances in Mumbai Bar till 3.30 am.Mr @Dev_Fadnavis Isn't the law equal for everyone?
Or are your leaders bigger than the land of the law ?… pic.twitter.com/CyIyk7XFqI
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 1, 2023
संजय राऊतांनी पत्रात काय लिहिलं आहे?
शनिवार, दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी पहाटे लिंक रोड, खार पश्चिम येथे घडलेल्या घटनेकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो.
मुंबईत रेस्टॉरंट आणि बार साधारण 1 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी असताना रेडिओ बार पहाटे 3.30 वाजेपर्यंत सुरू होता. आतील धिंगाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात त्रास होऊ लागला. बाहेर ट्रॅफिक जाम झाले, म्हणून संभाजी ब्रिगेडचे सचिन कांबळे आत जाऊन विनंती करू लागले. तेव्हा त्यांच्यावरच जबरदस्ती आणि धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला. बारमध्ये मोठ्या प्रमाणावर मुली होत्या आणि त्यांच्या गराड्यात भाजप नेते मोहित कम्बोज मद्यधुंद अवस्थेमध्ये होते. कांबळे यांनी पोलिसांना पाचारण केले. मोहित कम्बोज वर्दीतल्या पोलिसांशी दादागिरीच्या भाषेत अर्वाच्च पद्धतीने बोलू लागले. काही पोलिसांना धमक्या दिल्या.’हिंमत असेल तर मला इथून बाहेर काढून दाखवा, मी आता देवेंद्रला फोन करतो बघा,’ असं तो राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावाने धमकावू लागला. पोलीस हतबलतेने हा सर्व तमाशा अपमानित होऊन पाहत राहिले. पोलिसांसमोर कम्बोज त्याही अवस्थेत दारू पित होते.
याबाबतचे हॉटेल व बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज त्वरित पोलिसांनी जप्त करावेत. कम्बोज वारंवार देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांचा उल्लेख करत असल्याने पोलिसही दबावाखाली आले. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर आहे. महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या नावाने मोगलाई सुरू असल्याचे दिसून येते. रेडिओ बार अंमली पदार्थांचे सेवन, विक्री तसंच पिकअप पॉईंट म्हणून कुप्रसिद्ध आहे. शनिवारी पहाटेपर्यंत येथे बेकायदेशीरपणे अंमली पदार्थांचे सेवन, विक्री सुरू होती. भाजपचे नेते तिथे मद्यधुंद अवस्थेत उपस्थित होते व गृहमंत्र्यांच्या नावाने धमकावत होते. ही बाब गंभीर आहे. खार पश्चिमेला रेडिओ बार कोणाच्या मालकीचा आहे, त्याचा तपास करून पोलिसांना धमकावणाऱ्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई व्हावी व नियम मोडणाऱ्या संबंधित रेडिओ बारचा परवाना रद्द करावा.
गृहमंत्री म्हणून आपल्या प्रतिष्ठेचा विषय असल्याने मी ही तक्रार करत आहे, असं संजय राऊतांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे