• Mon. Apr 28th, 2025

लातूर नंतर रेणापूरातही देशमुखांचाच डंका, बिनविरोधसह सर्व जागांवर विजय

Byjantaadmin

May 1, 2023

रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Renapur APMC Result News)लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील कृषी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. काँग्रेसने सर्वच्या सर्व जागा जिंकल्याने भाजपचा दारुण पराभव झाला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला.

लातूर बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर रेणापूरातही सर्व जागा जिंकत DHIRAJ DESHMUKH बंधूंनी आपली ताकद दाखवून दिली. भाजपला लातूरपाठोपाठ रेणापूरातही खाते उघडता आलेले नाही. रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. CONGRESS रविवारी मतदान झाल्यानंतर रात्री सात वाजण्याच्या सुमारास निकाल घोषित करण्यात आला.

शेतकरी आणि सर्वसामान्यांचा विकास हेच आमचे एकमेव ध्येय आहे, असे सुरवातीपासून सांगणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी भरभरून मते दिली. त्यामुळे काँग्रेसच्या कृषी विकास पॅनलने रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवून विरोधकांचे मनसुबे उधळून लावले. या निवडणुकीत काँग्रेसच्या कृषी विकास पॅनलमधील बाळकृष्ण खटाळ हे पूर्वीच बिनविरोध निवडले गेले होते.

उर्वरित १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रमोद बाळासाहेब कापसे, अशोक रामराव राठोड, मुरलीधर पंढरीनाथ पडोळे, प्रकाश मनोहर सुर्यवंशी, अमर भारतराव वाकडे, सुशीलकुमार व्यंकटराव पाटील, नागनाथ श्रीराम कराड, जयश्री तुकाराम जाधव, राजामती राजाभाऊ साळुंके, उमाकांत निवृत्ती खलंग्रे, शेषेराव केशवराव हाके, प्रवीण सतीश माने, शिरीष उद्घवराव यादव, शिवाजी काशिनाथ आचार्य, विश्वनाथ बळवंत कागले, कमलाकर हरिभाऊ आकनगिरे, जनार्दन रामचंद्र माने हे काँग्रेसचे उमेदवार बहुमताने विजयी झाले.

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आशीर्वादाखाली, दिलीपराव देशमुख आणि माजी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उभारलेल्या ‘कृषी विकास पॅनल’ने सर्वच्या सर्व जागा जिंकून घवघवीत यश मिळवले. याबद्दल सर्व विजयी उमेदवारांचे मी अभिनंदन करतो. आमच्यावर विश्वास दाखवून मतदान केलेल्या सर्व मतदारांचे आणि निवडणुकीत विजयासाठी झटलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो, अशा शब्दात धिरज देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या निवडणुकीत आम्ही केलेल्या विकासात्मक कामाच्या बळावर मते मागितली. पुढे आम्ही काय करणार आहोत, हे सांगितले. त्यामुळे लोकांना हे पटले आणि त्यांनी विकासाला मतदान केले. केवळ टीका करणाऱ्या विरोधकांना मतदारांनी या निवडणुकीत पुन्हा एकदा नाकारले, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed