अहमदनगर : महसूलमंत्रीपद मिळाल्यापासून संगमनेरच्या राजकारणात हस्तक्षेप करून तेथे आपली सत्ता मिळविण्याचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सतत प्रयत्न सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत बऱ्यापैकी यश मिळाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीतही विखे पाटील यांनी आक्रमकपणे लक्ष घातले. प्रचारासाठी स्वत: फिरले. मात्र, यावेळी त्यांना यश आले नाही. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १८ जागा जिंकून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. थोरातांचे सर्व उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले तर विखे यांच्या अधिपत्याखालील भाजप प्रणित मंडळाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
‘ये बंदा लय जोरात बाळासाहेब थोरात’
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील मोठी व शेतकऱ्यांसाठी सुख सुविधा देणारी अद्ययावत बाजार समिती म्हणून ओळखली जाते. या बाजार समितीवर काँग्रेसचे नेते थोरात यांचे एक हाती यांची वर्चस्व राहिले आहे. गेली अनेक वर्षे या बाजार समितीच्या निवडणुका बिनविरोध होत होत्या. मात्र यावर्षी विरोधकांमुळे निवडणूक घेण्याची वेळ आली. तरीही यातून थोरात यांचेच वर्चस्व सिद्ध झाले.
थोरातांनी १८ पैकी १८ जागा जिंकल्या
सोसायटी मतदारसंघातून विद्यमान सभापती शंकरराव हनुमंता खेमनर, कान्हेरे सुरेश रामचंद्र, खताळ सतीश विश्वनाथ, गायकवाड गीताराम दशरथ, गोपाळे मनीष सूर्यभान, पानसरे कैलास बाळासाहेब, सातपुते विजय विठ्ठल, हे निवडून आले आहे. तर महिला राखीव मतदार संघातून सौ. वरपे दिपाली भाऊसाहेब व सौ साकोरे रुक्मिणी शिवाजी या विजयी झाल्या आहेत. इतर मागासवर्गीय मतदार संघातून -ताजने सुधाकर पुंजाजी तर भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून-घुगे अनिल शिवाजी हे विजयी झाले आहेत. व्यापारी मतदारसंघातून भंडारी मनसुख शंकर व शेख निसार गुलाब हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. तर ग्रामपंचायत मतदार संघातून- वाघ अरुण तुळशीराम, शरमाळे सखाहारी बबन, खरात संजय दादा, कडलग निलेश बबन हे विजयी झाले आहेत. दुसरीकडे मैत्रीपूर्ण लढत झालेल्या हमाल मापाडी मतदारसंघातून करपे सचिन बाळकृष्ण हे विजयी झाले आहेत.
थोरातांच्या हातून सगळ्यांचा सत्कार
या सर्व विजयी उमेदवारांचा थोरात यांच्या यशोधन कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीतभाऊ थोरात, बाबा ओहोळ, मिलिंद कानवडे, विश्वासराव मुर्तडक, शिवसेनेचे संजय फड उपस्थित होते.
मैत्रीपूर्ण झालेल्या हमाल मापाडी मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते बाळकृष्ण करपे व विजयी उमेदवार सचिन बाळकृष्ण करपे यांनी विजय होताच नामदार बाळासाहेब थोरात यांच्या विजयाच्या घोषणा देत शेतकरी विकास मंडळाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर करून यापुढेही त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचे म्हटले आहे
नगरमध्ये थोरातच जोरात! विखेंचा होमग्राऊण्डवर धुव्वा, उमेदवाराला अवघं एक मत
शिर्डी : सध्या राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे आजी माजी महसूलमंत्र्यांच्या पॅनलमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. संगमनेर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १८ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा पॅनलचा पराभव केला आहे. तसेच राहुरी बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पॅनलने विखे-कर्डिले युतीच्या पॅनलला धक्का देत १८ पैकी १६ जागा जिंकत बाजार समितीवर सत्ता राखली आहे.
विखेंच्या उमेदवाराला फक्त एक मत
महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंच्या जनसेवा मंडळाच्या उमेदवाराला केवळ एकच मत मिळालं. संगमनेर बाजार समिती निवडणुकीत हमाल माथाडी मतदारसंघात सोमनाथ दिघे या उमेदवाराला केवळ स्वतःचेच मत मिळाले आहे. हमाल माथाडी मतदारसंघात १४७ मतदार होते, यात थोरातांचे उमेदवार सचिन कर्पे यांना ५२ अपक्ष मते, आणि इतर ९४ मते मिळाली आहेत.
मतदारांचा थोरातांवर विश्वास : जयश्री थोरात
यावेळी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात म्हणाल्या की, आज सर्वाधिक आनंद होतोय, खूप वर्षानंतर बाजार समितीची निवडणूक पार पडली. सर्व कार्यकर्ते जल्लोष साजरा करतायत. मतदारांनी ठामपणे दाखवून दिले की ते थोरातांमागे खंबीरपणे उभे आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवलाय. आमच्या पॅनलच्या सर्वच्या सर्व १८ जागा आल्या आहेत हा एक प्रकारचा महाविकास आघाडीचा सामूहिक विजय आहे.