भाजपचे खासदार व राष्ट्रीय कुस्तीगीर परिषेदेचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्या विरोधात एफआयआर दाखल होण्याची चर्चा आहे. तरीही सिंग यांच्याविरोधात कुस्तीपटू आंदोलन थांबवायला तयार नाहीत.दरम्यान, जर आपल्या राजीनाम्यावर आंदोलक कुस्तीपटूंचे समाधान झाल्यास आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. तर बृजभूषण यांचा राजीनामा नको, तर त्यांना अटक झाली पाहिजे, या भूमिकेवर कुस्तीपटू ठाम आहेत
महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. महिला कुस्तीपटूंनी दुसऱ्यांदा जंतरमंतरवर धरणे आंदोलन केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आता बृजभूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे. ब्रिजभूषण शरण सिंग यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राजीनामा देण्याबद्दल भाष्य केले आहे. ते म्हणाले, “माझ्या विरोधात एफआयआर दाखल केला जाऊ शकतो, हे मला कळले आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून तेथेच सर्व काही स्पष्ट होईल, दरम्यान, मी कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी खेळाडूंची इच्छा असेल तर मी तसे करण्यास तयार आहे, पैलवानांनी आंदोलन संपवून सरावाला सुरुवात करावी.”
कुस्तीपटूंची ठाम भूमिका :
ब्रिजभूषण यांच्या राजीनाम्याच्या तयारीवर कुस्तीपटू समाधानी नाहीत. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, त्यांनी राजीनामा दिल्याने काय फरक पडणार असे कुस्तीपटू म्हणाले. जोपर्यंत ब्रिजभूषणला अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याची भूमिका कुस्तीपटूंची आहे.
तर दुसरीकडे, ब्रिजभूषण यांच्या विरुद्ध एफआयआरचा निर्णयावर कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली की, “विजयाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे, मात्र आमचा विरोध कायम राहील.” कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर ब्रिजभूषण यांच्या विरुद्धच्या सर्व फौजदारी कारवाईची यादी असलेला एक मोठा बॅनर लावला आहे. याबाबत कुस्तीपटू विनेश फोगट म्हणाली की, “दिल्ली पोलिसांना एफआयआर नोंदवायला सहा दिवस लागले आणि आमचा तपास यंत्राणांवर विश्वास नाही.”