हैदराबादः तेलंगणाबाहेर जाऊन देशातील इतर राज्यांत आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी पक्षनाव बदल करणाऱ्या भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्राकडे पहिले लक्ष वळवले आहे. महाराष्ट्रामध्ये पक्ष रुजवण्यासाठी आगामी सर्व जिल्हा परिषद निवडणुका लढण्याचा निर्णय तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जाहीर केला.
महाराष्ट्रामध्ये पाय रोवण्यासाठी येत्या ७ मे ते ७ जूनपर्यंत प्रत्येक गावामध्ये पक्ष समितीची स्थापना करण्यात येणार असून ‘किसान रॅली’ही काढली जाणार आहे. या रॅलीत १० ते १२ लाख नागरिक सहभागी होतील, असा दावा पक्षाच्यावतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात तीन सभांचे आयोजन केले आहे. त्यानंतर आता पुढील पाऊल म्हणून जिल्हा परिषद निवडणुकांच्या माध्यमातून गावागावांत पोहोचण्याचा प्रयत्न आहे.
घरोघरी जाऊन लोकांना आपल्या पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तर नागपूर आणि औरंगाबादमध्ये पक्षाचे कायमस्वरूपी कार्यालय स्थापन करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. ‘भारत परिवर्तन मिशन’ म्हणून ‘भारत राष्ट्र समिती’ काम करणार आहे, असे राव यावेळी म्हणाले.