• Wed. Apr 30th, 2025

पराभव समोर दिसत असल्यामुळे मानसिक संतुलन बिघडलेल्या आमदार कराड यांच्याकडून बेताल वक्तव्य. – विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे

Byjantaadmin

Apr 26, 2023

पराभव समोर दिसत असल्यामुळे मानसिक संतुलन बिघडलेल्या
आमदार कराड यांच्याकडून बेताल वक्तव्य.
—– विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे
लातूर (प्रतिनिधी) : दुरदृष्टी ठेऊन उभारलेल्या मांजरा परिवारातील साखर
कारखान्यांनी लातूर जिल्ह्यात आर्थिक क्रांती आणली आहे. हे कारखाने
उत्कृष्ठ चालविल्यामुळे सामान्य माणसाचे जीवनमान उंचावले आहे. विकासाची
मंदीरे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कारखान्यावर आणि कारखाने चालवणाऱ्या
नेतृत्वावर टिका करण्याचा साधी गुळ फॅक्टरीही उभी करु न शकलेल्या अहंकारी
आमदार रमेश कराड यांना अधिकार नाही. जिल्ह्यातील संपुर्ण शेतकरी, कष्टकरी
समाजाच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करीत असल्याचे सांगून आगामी काळात
असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा कडक इशारा विलास साखर कारखान्याचे
उपाध्यक्ष रविंद्र काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे यांनी ऊस उत्पादक शेतकरी,
शेतमजूर यांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरु आहे. या निवडणूकीत उभे
करण्यासाठी ज्यांना उमेदवार मिळाले नाहीत. पक्षातील लोकांकडून सहकार्य
मिळत नाही असे आमदार रमेश कराड यांचे मानसिक संतूलन बिघडले आहे. लातूर,
रेणापूर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी विकास पॅनलचा विजय दिसत
असल्यामुळे आमदार रमेश कराड यांनी शनिवारी त्यांचा पॅनलचा मेळावा घेऊन
त्यात असंबंध अशी वक्तव्य केली आहेत.
आमदार रमेश कराड यांनी आयोजीत केलेल्या मेळाव्याकडे मतदार आणि त्यांच्या
पक्षातील नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. या परिस्थितीत त्यांनी
विषय आणि ताळतंत्र सोडून तालुक्यात आणि जिल्ह्यात चांगल्या चालणाऱ्या
संस्थावर टिका केली, चांगल्या संस्था चालवणाऱ्या नेतृत्वावर गरळ ओकण्याचा
घाणेरडा प्रकार केला आहे, त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे
काळे यांनी म्हटले आहे.
आ. कराड यांनी केलेल्या आरोपाचा समाचार घेताना विलास कारखान्याचे
उपाध्यक्ष काळे यांनी म्हटले आहे की, माळरानावर उभ्या राहिलेल्या मांजरा
कारखान्याने फक्त लातूर जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात साखर कारखानदारी
चालु शकते हे सिद्ध करुन देशात आदर्श कारखाना म्हणून नावलौकीक मिळवला
आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव दिल्यामुळे शेतकऱ्यांचे आणि
शेतमजुरांचे जीवनमान बदलले आहे. शहराप्रमाणे घरे आणि बंगले ग्रामीण भागात
दिसु लागले आहेत. आर्थिक संपन्नता आल्यामुळे शेतकऱ्यांची मुले उच्च
शिक्षीत होऊन अधिकारी बनली आहेत. ही वस्तुस्थिती असताना हा कारखाना
शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य् भाव देत नाही असे म्हणणे आमदार कराड यांना
शोभत नाही.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना चांगला
चालल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला. त्यामुळे परिसरात ऊस लागवड
वाढली. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा विलास, रेणा, जागृती,
संत शिरोमणी मारुती महाराज, टे्न्टीवन शुगर्स हे साखर कारखाने उभे
राहिले. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन उदगीर येथील प्रियदर्शनी कारखाना हा
विलास कारखान्याने चालु केला आहे. मांजरा परिवारातील हे सर्वच कारखाने
मराठवाड्यात सर्वात चांगले चालत असून शेतकऱ्यांच्या ऊसाला एफ.आर.पी.
पेक्षा भाव जास्त दिला जात आहे. असे असताना हे कारखाने योग्य भाव देत
नाहीत असा आमदार कराड यांनी केलेला आरोप हास्यास्पद आहे.
मागच्या वर्षाच्या गळीत हंगामात ऊसाची वाढलेली लागवड लक्षात घेऊन
मांज्रा, रेणा, मारुती महाराज या कारखान्यांनी गाळप क्षमतेत वाढ केली
आहे. विस्तारीकरणाचे काम सुरु असल्यामुळे हे कारखाने थोडे उशीराने सुरु
झाले. यासंबंधीची शेतकऱ्यांना माहीती आहे. मात्र केवळ टिका करावयची
म्हणून आमदार कराड यांनी वस्तुस्थिती बाजुला ठेऊन टे्न्टीवन शुगर्स
कारखान्यासाठी सहकारी साखर कारखाने उशीराने चालु केले, असे म्हणने
बालिशपणाचे आहे. विलास सहकारी साखर कारखाना टे्न्टीवन शुगर्सच्याही अगोदर
सुरु झाला होता याबाबत मात्र ते चकार शब्दही काढत नाहीत.
लोकातून निवडून येऊ शकत नाहीत म्हणून मागच्या दाराने आमदार होणाऱ्या रमेश
कराड यांच्या विकासाच्या गप्पाही पोकळ आहेत. माजी मंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी अभ्यापुर्ण
नियोजनातून आणलेल्या योजना मीच आणल्या अशा पोकळ वल्गना आमदार कराड करीत
आहेत. माजी मुख्यमंत्री आदरणिय विलासराव देशमुख साहेब, सहकारमहर्षी
दिलीपराव देशमुख साहेब यांच्या संस्काराचा वारसा जपणारी नवी पिढी आमदार
कराड यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे दिवसेंदिवस बिनबुडाचे
आरोप आणि बेताल वक्तव्ये करण्याची आमदार कराड यांची प्रवृत्ती बळावत आहे.
सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते रितेश देशमुख यांच्या उद्योगाच्या संदर्भाने
केलेले आरोप सहकार विभागाने फेटाळून लावल्यानंतरही आ.कराड यांनी पुन्हा
तेच तुणतुणे कालच्या मेळाव्यात वाजवले आहे. त्यांनी केलेल्या सर्व बेताल
वक्तव्याचा आम्ही निषेध करीत असून पुन्हा अशी वक्तव्ये केल्यास जशास तसे
उत्तर दिले जाईल, असेही काळे यांनी म्हटले आहे.
उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूर निवडणूक 2023 लढवत असलेल्या
शेतकरी विकास पॅनलने कृषी संस्कृतीचे प्रतिक म्हणून नंदीबैल हे निवडणूक
चिन्ह निवडले आहे. या पॅनलला मतदारातून प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत
असल्यामुळे आमदार कराड यांच्या पायाखालची जमीन सरकली असून त्यांचे मानसिक
संतुलन बिघडल्याचे दिसत आहे. त्यांनी बेताल, अनावश्यक वक्तव्ये बंद
करावीत, लातूरच्या सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लागणार नाही, याची काळजी
घ्यावी, असेही शेवटी विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे
यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed