महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा एक इंचही हलवला जाणार नाही-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांच्या पुढाकारातून खा. श्रृंगारे यांच्या नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळास आश्वासन
लातूर ः- लातूर शहरातील जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा कोणत्याही परिस्थितीत एक इंचही हलवला जाणार नाही , असे आश्वासन केंद्रीय रस्ते ,वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा हलवू नये या मागणीसाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून दिल्ली येथे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या नेतृत्वात लिंगायत समाज बांधवाचे शिष्टमंडळ मंत्री नितीन गडकरी यांना भेटले. या भेटीप्रसंगीच संबंधीत अधिकार्यांना ना. गडकरी यांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता पुतळा हलवला जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
लातूर शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा इतरत्र हलवला जाणार, अश्या प्रकारची राजकीय चर्चा होत होत्या. तसेच याबाबत प्रशासकीय हलचाली सुरु झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे लिंगायत समाज बांधवांचे शिष्टमंडळ माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांना भेट होते. त्यावेळी आ. निलंगेकर यांनी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा एक इंचही हलू दिला जाणार नाही असा विश्वास दिला होता. तसेच यासंबंधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चाही करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. दरम्यान पुतळा हलवू नये यासाठी उपोषण आंदोलने करण्यात आली. या आंदोलनाला भेट देऊन आ. संभाजी पाटील निलंगेकर आणि खासदार सुधाकर शृंगारे यांनी पुतळा हलणार नाही अशी ग्वाही देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून पर्याय काढला जाईल असे सांगितले होते. त्यानुसार माजी मंत्री आ. निलंगेकर यांच्या पुढाकारातून व खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या नेतृत्वात लिंगायत समाजातील नागरिकांचे एक शिष्टमंडळ मंत्री नितीन गडकरी यांना भेटले. या भेटी दरम्यान लिंगायत समाजातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन, महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा एक इंचही हलवला जाणार नाही, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे. नितीन गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनामुळे मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
दिवसेंदिवस वाढते शहर लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने पुतळा न हलवता इतर पर्याय सुचविण्याच्या सूचना नितीन गडकरी यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता पुतळा न हलवता इतर पर्यायांचा विचार केला जाणार आहे. आज दिल्लीत भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळाला नितीन गडकरी यांनी वेळ उपलब्ध करून देत, सविस्तर चर्चा केली. लिंगायत समाजातील नागिरकांच्या भावनांचा आदर करण्याच्या दृष्टीने महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा एक इंचही हलवला जाणार नाही असे आश्वासन दिले आहे. माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी लिंगायत समाज बांधवांना जो शब्द दिलेला होता तो शब्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनामुळे आता सत्यात उतरलेला आहे. त्यामुळे माजी मंत्री आ. निलंगेकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्याचबरोबर खा. सुधाकर श्रृंगारे यांनीही याबाबत शिष्टमंडळाला सोबत घेऊन केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतल्यामुळे खा. श्रृंगारे यांनी महात्मा बसवेश्वर दिनी दिला शब्द पाळला आहे. आता महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हटवला जाणार नाही या केेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनाने लातूर शहरासह जिल्ह्यातील महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या विचारांचा आदर करणार्या नागिरकांमध्ये आनंद व्यक्त केला जातो आहे.
महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा एक इंचही हलवला जाणार नाही-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
