बीड, : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या छळाला कंटाळलेल्या पत्नीने आपल्या पतीची हत्या केली. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पती दारूच्या नशेत सतत आपल्या पत्नीला मारहाण करत होता. अखेर छळाला कंटाळलेल्या पत्नीने पतीची डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. मोतीराम पिराजी गुट्टे वय 38 वर्ष असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणात मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीचा छळ
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही धक्कादायक घटना बीडच्या दैठणघाट गावात घडली आहे. मोतीराम पिराजी गुट्टे वय 38 असं मृत पतीचं नाव आहे. तो आपली पत्नी वनमाला गुट्टे हिला सतत दारूच्या नशेत मारहाण करत असे. वनमाला पतीकडून होणाऱ्या छळाला वैतागली होती. अखेर तिने डोक्यात दगड घालून पतीला संपवलं.
डोक्यात दगड घालून हत्या
पहाटेच्या सुमारास वनमाला गुट्टे हिने पतीच्या डोक्यात दगड टाकला तसेच त्याच्या शरीरावर कात्रीने वार केले. या घटनेमध्ये मोतीराम गुट्टे याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात मोतीराम गुट्टे यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पत्नी वनमाला गुट्टेविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे