मुंबई : ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज वयाची पंच्याहत्तरी पार केलीये. त्यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त सर्वपक्षीय नेतेमंडळींनी उपस्थिती लावलीये. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खुमासदार भाषण केलं. शिवसेनेची स्थापना, भुजबळ-बाळासाहेबांचं नातं, ठाकरे कुटुंबासोबत असलेला भुजबळ कुटुंबियांचा स्नेह, त्यानंतर भुजबळांनी घेतलेली बंडाची भूमिका आणि त्यानंतर २८ वर्षांनी महाविकास आघाडीची झालेली स्थापना अशा विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य करताना भुजबळांचं महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केलं. यावेळी अजितदादांच्या भुजबळांवरील फटकेबाजीलाही ठाकरेंनी उत्तर दिलं, ज्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला तर पुढील काही वेळ शिट्ट्याच थांबल्या नाहीत.
जेष्ठ नेते छगन भुजबळांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या सत्काराचे भुजबळ गौरव समितीने आयोजन केलं होतं. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, प्रज्ञावंत लेखक-कवी डॉ. जावेद अख्तर, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत.
अजितदादांचा चौकार, ठाकरेंनी संधी मिळताच षटकार मारला
उद्धव ठाकरे यांच्याआधी अजित पवार यांचं भाषण झालं. अजितदादांनी नेहमीच्या शैलीत तुफान फटकेबाजी केली. भुजबळांचं मोठेपण सांगतानाच त्यांची मुख्यमंत्रिपदाची त्यांची संधी कशी हुकली, याचाही किस्सा अजित पवार यांनी सांगितला. १९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्यानंतरची निवडणूक वेळेत होणे अपेक्षित होते. पण सहा महिने अगोदरच विधानसभेची निवडणूक घेतली गेली. जर वेळेनुसार निवडणूक घेतली असती तर प्रचाराला वेळ मिळाला असता. त्यावेळीही आपल्या ५८ जागा आल्या आणि काँग्रेसला ७५ जागा मिळाल्या. पण आणखी चार-पाच महिने जर प्रचाराला मिळाले असते ना… तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते, असं अजितदादा म्हणाले.
तर भुजबळ आधीच मुख्यमंत्री झाले असते!
अजितदादांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले. ठाकरे बोलायला उभे राहिल्यावर सभागृहातल्या टाळ्या काही वेळ थांबल्या नाहीत. उद्धवसाहेब आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, अशा घोषणा सभागृहातील लोकांनी दिल्या. सभागृहातील लोकांचा पाठिंबा पाहून उद्धव ठाकरे भारावून गेले. काही संकेदाचा पॉझ घेऊन ठाकरेंनी बोलायला सुरुवात केली. भुजबळ-बाळासाहेबांचं नातं, ठाकरे कुटुंबासोबत असलेला भुजबळ कुटुंबियांचा स्नेह, असं सगळं सांगताना त्यांनी भुजबळांच्या ‘त्या’ हुकलेल्या मुख्यमंत्रिपदावर खुमासदार कमेंट केली. अजितदादा म्हणाले, त्यावेळी पाच महिने प्रचाराला मिळाले असते तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते, पण मला म्हणायचंय, भुजबळांनी जर शिवसेना सोडली नसती तर ते आधीच मुख्यमंत्री झाले असते!
उद्धव ठाकरे यांच्या या हजरजबाबी उत्तराने संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. शरद पवार खळखळून हसले. मंचावरील नेत्यांमध्येही खसखस पिकली, भुजबळ तर अगदी हसून लोटपोट झाले. शेवटी छगन भुजबळांनी हात जोडत ठाकरेंना अभिवादन केलं!