• Wed. May 7th, 2025

जळगाव : उद्धव ठाकरे यांचे शक्तिप्रदर्शन; बंडखोरांना आव्हान

Byjantaadmin

Apr 20, 2023

जळगाव : शिवसेना दुभंगल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रथमच जळगाव दौऱ्यावर येत असून यानिमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी ठाकरे गटाने केली आहे. पाचोरा येथे रविवारी सायंकाळी ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. ती भव्यदिव्य करण्यासाठी स्थानिक पातळीवर बैठकांचे सत्र सुरू आहे. पक्षात फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील चार आमदार शिंदे गटात गेले. कधीकाळी कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील हे सातत्याने ठाकरे गटावर टिकेची झोड उठवित आहेत. आमदार शिंदे गटात गेले असले तरी सर्वसामान्य शिवसैनिक ठाकरे गटाकडेच असल्याचे सिद्ध करण्यासाठी सभा यशस्वी करण्यासाठी जोर लावण्यात आला आहे.

रविवारी उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जळगावमधील पिंप्राळा उपनगरातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन होईल. सायंकाळी साडेसहा वाजता पाचोरा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे प्रमुख नेते आणि दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचेही अनावरण करण्यात येणार आहे. माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी सभेचे आयोजन केले आहे. या सभेच्या जाहिरातीची चित्रफीत ठाकरे गटाने प्रसिद्ध केली आहे. तयारीचा आढावा घेण्यासाठी खा. संजय राऊत हे शुक्रवारी रात्री जळगावात दाखल होणार आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, शिंदे गटाला शह देण्यासाठी स्थानिक पातळीवर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचे नियोजन आहे.

शिवसेनेत फूट पडली तेव्हा पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, पारोळ्याचे चिमणराव पाटील, जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील, चोपड्याच्या लताबाई सोनवणे, मुक्ताईनगरचे तत्कालीन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. आमदार किशोर पाटील पहिल्यापासून शिंदे यांच्यासोबत राहिले आहेत. ठाकरे यांनी शिंदे गटातील प्रत्येक आमदार आणि मंत्र्याला लक्ष्य करण्याचे धोरण ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिंदे गटातील जिल्ह्यातील एकेकाळच्या कट्टर मावळ्यांविरोधात सभेच्या निमित्ताने रणशिंग फुंकले जाणार आहे. आमदार पाटील हे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांची चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी-पाटील यांनी ठाकरे गटाला समर्थन दिले. पुढील निवडणुकीत त्याच ठाकरे गटाच्या उमेदवार राहण्याची शक्यता आहे. आता त्या पाचोरा तालुक्याची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यानंतर आमदार किशोर पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशी असे चित्र निर्माण झाले आहे.

नव्याने पक्ष बांधणीसाठी ठाकरेंनी जाहीर सभेचा मार्ग अनुसरला आहे. महाविकास आघाडीतर्फे वज्रमूठ सभा घेतल्या जात आहेत. यापूर्वीही ठाकरे यांच्या छत्रपती संभाजीनगर, खेड, मालेगाव येथे जाहीर सभा झाल्या आहेत. शिंदे गटात जाऊन भाजपशी हात मिळवणी करणाऱ्यांचा त्यांच्याकडून जोरदार समाचार घेतला जात आहे. जळगाव जिल्ह्यात त्याची पुनरावृत्ती होण्याची शिवसैनिकांना खात्री आहे. स्थानिक पातळीवर शिंदे गटात गेलेल्या आमदारांची संख्या मोठी आहे. त्यांना धडा शिकविण्याची मुहूर्तमेढ सभेच्या माध्यमातून रोवली जाईल. महत्त्वाचे म्हणजे, ठाकरे यांच्या स्वागतासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही पुढे सरसावले आहेत.

उद्धव ठाकरे यांचे रविवारी सकाळी ११ वाजता जळगाव विमानतळावर आगमन होईल. तेथून खासगी मोटारीने पाचोरा तालुक्याकडे मार्गक्रमण करतील. दुपारी साडेबाराला पाचोरा निर्मल सीड्स विश्रामगृहात ते जातील. साडेचार वाजता पाचोरा येथे तात्यासाहेब आर. ओ. पाटील प्रयोगशाळेचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते होईल. सायंकाळी सव्वापाचला आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करून सायंकाळी सव्वासहाला एम. एम. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा आणि रात्री आठला जळगाव किंवा छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, या दौऱ्यात जळगाव शहरातील पिंप्राळा उपनगरातील शिव स्मारकाचे भूमिपूजनाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जागेची व रस्त्यांची पाहणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *