हरियाणा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी महिलांच्या संदर्भात अजब वक्तव्य केले आहे. राज्यातील एका महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना भाटिया म्हणाल्या की, ‘मुली ओयो रुममध्ये हनुमानाची आरती करायला जात नाहीत, अशा ठिकाणी जाताना तुमच्यासोबत वाईटही घडू शकते, याचे भान ठेवायला हवे, ‘ अशा प्रकारचं वक्तव्य भाटीया यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने आता उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
आरकेएसडी महाविद्यालयात सायबर क्राईम आणि जनजागृती कार्यक्रमा दरम्यान, महिलांच्या छेडछाडीबाबत जनजागृती व्हावी, या विषयावर त्यांना कार्यक्रमात बोलायचे होते. यासाठी त्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी भाटिया म्हणाल्या की, ‘सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिप सारख्या कायद्यामुळे आमचे हात बांधले गेलेत. लिव्ह-इन रिलेशनशिप सारखा कायद्याचा पुनर्विचार करणे, त्यात बदल करणे, आवश्यक आहे, असे ही मत भाटीयांनी व्यक्त केले.
लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत भाष्य करताना त्या म्हणाल्या, ‘मुली ओयो रुममध्ये हनुमानजीची आरती करायला तर जात नाहीत. अशा वेळी या संबंधी तुमची स्वतःचीच जबाबदारी असते. लैंगिक शोषणाच्या ज्या काही प्रकरणं पुढे येतात. त्या बहुतांशी लिव्ह इनबाबत असतात. याबाबतीत हस्तक्षेप करून परिस्थितीला हाताळणे कठीण असते. लिव्ह-इन रिलेशनशिप कायद्यांमुळे आमचेही हात बांधले गेलेत. अशा कायद्यामुळेच गुन्ह्यांमध्ये घट होत नाही कुटुंबव्यवस्था नष्ट होत आहे, असेही भाटीया म्हणाल्या.
शेवटी भाटिया यावेळी एका प्रकरणाचा दाखला देत म्हणाल्या की, “एका पीडित महिलेने आपल्या तक्रारवजा निवेदनात म्हटले आहे की, आरोपीने तिला पेयात काहीतरी वेगळे मिसळून प्यायला लावले, यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलींनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, अशा ठिकाणी काहीही चुकीच्या गोष्टी घडू शकतात.”