• Mon. May 5th, 2025

महाराष्ट्रासह ‘या’ तीन राज्यांत भाजप खासदारांची संख्या घटणार : पक्षाने नेमलेल्या समितीचा अहवाल

Byjantaadmin

Apr 19, 2023

मुंबई : महाराष्ट्रासह तीन राज्यांत भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची  संख्या मोठ्या प्रमाणात घटणार, असा अहवाल माजी मंत्री विनोद तावडे  समितीने पक्षश्रेष्ठींना सादर केला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा अहवाल तावडेंनी सादर केला, त्यानंतर भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. त्यातून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.

Vinod Tawde Committee

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी भाजपकडून माजी मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने देशभरातील भाजपच्या राजकीय ताकदीचा लोकसभेच्या दृष्टीकोनातून अंदाज घेतला आहे. त्यात काही राज्यात भाजपचे संख्याबळ घटणार असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

तावडे समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये भाजच्या लोकसभेच्या जागा घटण्याची शक्यता आहे. यातील महाराष्ट्र आणि कर्नाटकात भाजप व त्यांच्या मित्रपक्षाच्या मदतीचे सरकार आहे. बिहारमध्ये मात्र यांनी भाजपची साथ सोडून तेजस्वी यादव यांच्यासोबत सरकार स्थापन केले आहे. या तीनही राज्यात भाजपचे संख्याबळ घटणार असल्याचे खुद्द पक्षाने नेमलेल्या समितीने म्हटले आहे.

महाराष्ट्रात मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीला ४२ जागा मिळाल्या होत्या. त्यात आता दुहेरी आकड्यात घट होणार असल्याचे तावडे समितीने म्हटलेले आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे जास्तीत जास्त २२ ते २५ खासदारच निवडून येतील, असे तावडे कमिटीने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे काम पाहता महाराष्ट्रात भाजपचे २५ च्या वर खासदार जाणार नाहीत, असेही त्यात सांगितले आहे, त्यामुळे भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले आहे.

दरम्यान, कर्नाटकात तर विधानसभा निवडणुकीतही भाजप हरणार असा अंदाज येत आहे. त्यातच लोकसभेलाही भाजपला फटका बसणार, हे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील विविध चाचण्यांचा अहवाल भाजप विरोधात आहे, त्यामुळे भाजपला महाराष्ट्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील बड्या नेत्यांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *