• Mon. May 5th, 2025

शासकीय कार्यालयातून तंबाखू मुक्तीची सुरुवात ; नऊ कर्मचाऱ्यांना ठोकला दंड

Byjantaadmin

Apr 19, 2023

शासकीय कार्यालयातून तंबाखू मुक्तीची सुरुवात ; नऊ कर्मचाऱ्यांना ठोकला दंड

 

लातूर,(जिमाका):-जिल्हाधिकारी कार्यालय व कार्यालय परिसर व उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालय व कार्यालयाच्या परिसरातील शासकीय अधिकारी / कर्मचारी, कार्यालयात आलेले नागरिक यांना पान, सुपारी, गुटखा खाणे व थुंकणाऱ्यांवर अचानक भेट देऊन कोटपा 2003 कायाद्याचे  उल्लंघन करणाऱ्या 9 जणांवर कार्यवाही करत रुपये 1600/- दंड वसूल करण्यात आली आहे. यापुढे कोणीही तंबाखू, सुपारी, गुटखा खाल्यास त्याच्या दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना सर्व कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या निर्देशानुसार  सर्व शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार लातूर शहरात जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाची जिल्हाधिकारी कार्यालय व उपसंचालक आरोग्य सेवा, कार्यालयात कारवाई करण्यात आली.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपसंचालक डाॕ. ढेले, जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. लक्ष्मण देशमुख,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 17 एप्रिल,2023  रोजी जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने

शासकीय कार्यालयात कर्तव्यावर असतांना तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली. तंबाखू विरोधी कायदा (कोटपा-2003) नुसार शासकीय कार्यालय कर्तव्यावर असतांना, सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन व विक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत विविध सार्वजनिक ठिकाणी अचानक भेट देऊन पाहणी करण्यात येते. तसेच दोषींवर कारवाई करण्यात येते. निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे व कक्ष अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोटपा कायद्याअंतर्गत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या जिल्हा सल्लागार डॉ. उटीकर, राज्य प्रकल्प अधिकारी , तंबाखू नियंत्रण कार्यक्रम एम जी व्ही एस, औरंगाबादच्या झिया शेख, श्री. बेंब्रे, सौ. शेडोळे, अभिजीत संघाई यांच्या पथकाने ही कारवाई केली.

राज्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विरोधी कायदा कोटपा 2003 नुसार पालन करणे बंधनकारक आहे. उल्लंघन करणाऱ्या मुळे सरकारी मालमत्तेचे नुकसान होते. तसेच जे वापर करत नाहीत त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो, सार्वजानिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असून आपल्या युवा पिढीला यापासून वाचवण्यासाठी विविध प्रकारे कार्यवाही करण्यात येते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतो अशी माहिती जिल्हा सल्लागार डॉ. उटिकार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *