शिंदे गटाचे नेते व खासदार गजानन कीर्तीकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजपविषयी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रीय स्तरावर भाजपाचे ३५० खासदार निवडून येत असले, तरी महाराष्ट्रातील स्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात भाजपा कमकुवत आहे असं मत नाही. पण, शिवसेनेपेक्षा भाजपा मजबूत आहे असंही मान्य करणार नाही असा खळबळजनक दावा केला आहे.याचवेळी राष्ट्रवादीतून अजित पवारांसारखा नेता काही आमदारांसह पक्षातून बाहेर पडत असेल, तर आम्ही स्वागत करू असंही कीर्तिकर म्हणाले आहेत.
शिंदे गटाचे नेते व खासदार गजानन कीर्तिकर जालन्यात पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. कीर्तीकर म्हणाले,राष्ट्रीय स्तरावर सत्तेची सर्व सूत्र भाजपाकडे आहेत. पण, महाराष्ट्राचा विचार केला, तर भाजपाला एकहाती सत्तेची सूत्र कधीच मिळाली नाहीत. मिळण्याची शक्यताही नाही असंही कीर्तिकर म्हणाले आहेत.
कीर्तिकर नेमकं काय म्हणाले?
BJPआणि शिवसेनेतील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर महत्वपूर्ण टिप्पणी करताना कीर्तीकर म्हणाले, राष्ट्रीय स्तरावर भाजपाचे ३५० खासदार निवडून येतात. तर, महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेना नाही आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला २२ आणि भाजपाला २६ जागा असं वाटप झालं होतं. तेव्हा आमचे १८ खासदार निवडून आले, तर चार जणांचा पराभव झाला. भाजपाचे २३ जण निवडून आले, ३ जणांचा पराभव झाला. ही महाराष्ट्राची राजकीय वास्तव स्थिती आहे.
भाजपा आणि शिवसेनेचं जागावाटप कसं असेल?
आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावर कीर्तीकर म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १२६ जागांवर SHIVSENA आणि १६२ जागांवर भाजपाचे उमेदवार लढले होते. भाजपाचे १०२ उमेदवार जिंकले. तर, शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत याच पद्धतीने जागावाटप झालं पाहिजे.”
… तर अजित पवारांचं आम्ही स्वागत करू!
अजित पवारांनी भाजपाबरोबर जात पहाटे शपथ घेतली होती. अजित पवार काहीही करू शकतील, हे त्यांनी कृतीतून दाखवलं आहे. अजित पवार भाजपाबरोबर जात असतील, तर त्यास आमचा विरोध असण्याचं कारण नाही. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासारखा नेता काही आमदारांसह बाहेर पडत असेल, तर आम्ही स्वागत करू,” असंही गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं.