सहकार आणि ग्रामिविकासाचे यशस्वी सुत्र माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख
– राहूल हरिभाऊ इंगळे-पाटील
सहकारातूनी आली येथे समृध्दी
राबल्या चेहऱ्यावरी उजळला प्रकाश.
शेतकऱ्यांची येथे संपली आभाळ
कष्टाला लाभल सुखाच आकाश.
सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नेतृत्वाचे पैलू त्यांच्या कार्यातून समाजासमोर येत
असतात. एक बहूआयामी नेतृत्व सार्वजनीक जिवनात कस घडत आणि वाढत जात याचा
वस्तुपाठ म्हणजे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा राजकीय प्रवास आहे.
सामाजिक आणि राजकीय जीवनात त्यांनी गावचे सरपंचपद, स्थानिक स्वराज्य संस्था,
सहकारी संस्था, साखर उदयोग, सांस्कृतिक, क्रिडा क्षेत्र, विधान परीषद आमदार, अर्थ
राज्यमंत्री, क्रीडा व युवक कल्याण मंत्री म्हणून राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, क्रीडा,
सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात एक मोठ काम उभा केले आहे. या कार्यातून त्यांच्या नेतृत्वाची
पावती मिळते. शेतकरी, ग्रामिण भागातील माणसांना सहकाराच्या माध्यमातून जोडून
विकासाची प्रक्रीया सुरू केली. यामध्ये मोठे योगदान आदरणीय माजी मंत्री, सहकार महर्षी
दिलीपराव देशमुख यांचे आहे, आज त्यांचा वाढदिवस त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा.
राज्यातील सर्व जिल्हयामध्ये लातूर एक मागासलेला जिल्हा अशी ओळख होती. लातूर
जिल्हयातील ग्रामीण भागात मुलभूत सुविधांचा व शिक्षणाचा अभाव होता, दारिद्रय, बेरोजगारी
होती. पिढयानपिढयांच्या कर्मकांडात गुंतलेली समाजाची मानसिकता होती. विकासाची चार
पाऊलं टाकण्यासाठी लागणारी मनी मानसिकता आणि अंगी बळही नव्हतं. येथील लोकभावना
अशी होती की, वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलीया, पाकीस्तान गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर पराभूत
होणाऱ्या भारतीय क्रिकेट संघासारखी. पण संघात सचिन तेंडूलकर, महेंद्रसिंग धोनी व विराट
कोहलीचे आगमण झाल आणि पाहता पाहता भारतीय क्रिकेटविश्व जगात उजळून गेलं.
असाचा शतकभराचा मराठवाडयाच्या वाटयाला प्रवास आला. पण या जिल्हयाला माजी
राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, आदरणीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि
सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच नेतृत्व लाभल आणि पाहता पाहता एका विकासाच्या
नव्या वाटेवर लातूरचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात सहकार महर्षी दिलीपराव देशमुख
यांच्या कार्याच वेगेळेपण ठळकपणे जाणवत.
आदरणीय दिलीपरावजी देशमुख एक बहूआयामी नेतृत्व आहे. मराठवाडयातील
बाभळगाव येथील एका शेतकरी कुंटूबात ग्रामीण भागात त्यांचा जन्म झाला. गावच्या सरपंच
पदापासून राज्याचे मंत्री म्हणून काम करतांना सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी
उभारलेल विविध क्षेत्रातील काम पाहता असे दिूसून येते की, लातूर जिल्हयात एक नवीन
काम उभा करणे गरजेचे आहे. या जाणीवेने त्यांच्या कार्याची सुरूवात झाली. अगोदर येथील
सामाजिक वातावरण आणि विकासासाठी काय करणे गरजेचे आहे, याचा विचार करून त्यांनी
पाऊले टाकली. एका एका पदावरून पायरी-पायरीने पुढे जात असतांना विकासाची त्यांनी
नियोजनबद्ध आखणी केली. यामूळे पक्ष संघटना, सहकार, साखर उद्योग, स्थानिक स्वराज्य
संस्था, जलव्यवस्थापन, दुष्काळ, सिंचन क्षेत्र, शिक्षण, क्रीडा, पर्यावरण या सर्व क्षेत्रांमध्ये
त्यांनी आपल्या कामाची उभारणी केली.
पाणी आडवल शिवार नदीला
बॅक सुलभ पाठवली सेवेला.
समृध्दी फुलली कष्टानी लातूरला
वंदन करूया आपल्या नेतृत्वाला.
लातूरच मागासलेपण, गरीबी पाहता या ठिकाणी एक किंवा कांही शेतकरी एकत्र येऊन
उदयोगाचे मालक होऊ शकत नाहीत. याकरीता सहकारी तत्वावरील साखर उदयोगाची उभारणी
करण्यात आली. मराठवाडयात सहकार आणि साखर उदयोग रूजणार नाही असे म्हटल जायच.
पण याच साखर उदयोगातून सहकारसाठी नितीदर्शक आणि साखर उदयोगासाठी गतीदर्शक
कामांची उभारणी झाली. ऊसविकासाच्या योजनेतून शेतकरी आधुनिक शेती करू लागला. आज
तर ऊसशेती यांत्रीकीकरण झपाटयाने होत आहे. हा भाग सर्वाधिक साखर उतारा देणारा म्हणून
पूढे आला. साखर कारखाना वाटचालीतून उत्कृष्ट व्यवस्थापन, उत्कृष्ट प्रशासन, कल्याणकारी
योजनांची अमंलबजावणी झाली. शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक उस दर आणि कामगारांना चांगले
वेतन, बोनस देण्याची परंपरा निर्माण झाली. सहकार महर्षी दिलीपरावजींनी संस्थांमध्ये
लोकहिताची काम करताना अपप्रवृत्तीला थारा दिला नाही. ज्या संस्थेत चांगलं काम होत तेथे
चौखूर उधळणाऱ्यांना वेसन घातली, सभासदांच्या हिताला कुणी आड येत असेल तर त्यांच्यासाठी
कुंपण घातल, चुकीच वागू नये म्हणून त्याला नियमाचा कोलदांडा घातला. सहकार क्षेत्रातील
अपप्रवृत्ती रोखण्यासाठी दिलीपरावजीनी केलेल कार्य हे त्यांचा शिस्तप्रिय स्वभाव, नियोजन आणि
काटेकोर कारभाराचा प्रत्यय देतो. यामुळेच लातूर जिल्हयात सहकाराची विचारधारा प्रगतीची
जिवनधारा बनली आहे.
शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून लातूर मधील ग्रामीण व शहरी भागात अभ्यासक्रमाच्या
विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या संस्थातून शेकडो विदयार्थी ज्ञानार्जन करीत आहेत.
त्यांनी नेहमीच विज्ञानवादी, अंधश्रद्धा, रूढीपरंपरा, कर्मकांड यांना बाजूला सारून आधुनिक
दृष्टिकोन बाळगला. यामुळे लातूर जिल्ह्यात कुटुंब कल्याण योजना, साक्षरता अभियान अत्यंत
चांगल्या पद्धतीने राबवल गेल ही विशेष आहे. लातूरचा माणूस देवभोळा होता. कुटुंबात संख्या
मोठी असायची, दहाददा लेकरांच बिऱ्हाड प्रत्येक घरात थाटलेले. यासाठी लोकसंख्या शिक्षणा
शिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी कुंटूब कल्याणाचा आदर्श घालून दिला. ज्या विषयावर
बोलायला राज्यकर्ते धजावत नव्हते त्या विषयावर त्यांनी प्रत्यक्ष कृती केली. सहकारामध्ये शिस्त
आणली, साखर उद्योगांमध्ये अनाठाई खर्च कमी केला, बँकेमध्ये शंभर टक्के कर्ज वसुली झाली
पाहिजे, येथील माणूस साक्षर करत असताना अर्थसाक्षर ही बनवला.
लातूर जिल्हा दुष्काळी भाग मानला जातो. येथे सिंचनाच्या सोयीचा अभाव होता. यासाठी
राज्य सरकार, लातूर जिल्हा परिषद, सहकारी साखर कारखाना व जिल्हा बँकेच्या माध्यमातून
अनेक सिंचन योजना राबविण्यासाठी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म जलसंधारणाच्या
योजना, जलसंधारणासाठी विहीर, बोरवेल, पुनर्भरण तसेच जलसंवर्धन योजना, समतल पाझर
कालवा योजना राबविल्या आहेत. यामूळे दुष्काळमुक्तिच्या या सिंचनकामात येणाऱ्या काळात हे
काम वरदान ठरणार आहे.
शेतकरी शेतीची नाळ जोडली
सहकाराच विणूनी घटट जाळ.
येथे केली अशी दुष्काळमुक्ति
सिंचनास बांधल पाणीदार तळ.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी ज्या पदावर काम केल त्या पदाला न्याय दिला. त्या
पदाची ओळख त्यांनी स्वत:च्या कार्यातून निर्माण केली, त्या संस्थेमध्ये त्या कामातून एक नवा
आदर्श निर्माण केला, नवी मुल्ये दिली. त्या संस्थेमधून गेल्यानंतर परत या कामांमध्ये लुडबूड
केली नाही, म्हणून ज्या पदावर काम केल मग ते सरपंचपद, चेअरमन, अध्यक्ष, आमदार, मंत्री
पद असो त्या पदावरून गेल्यानंतर सुद्धा लोक त्याच पदावरवरून त्यांना ओळखतात, एवढी छाप
त्यांनी सोडलेली आहे. पूढची पिढी जेव्हा अशा संस्थेत विराजमान होते तेव्हा दिलीपरावजींनी
उभारलेला मार्ग त्यांना पथदर्शक ठरतो. यामुळेच त्यांचा कार्यस्पर्श झालेल्या सर्वच संस्था
यशस्वीपणे वाटचाल करीत असल्याचे दिसून येते.
आज देशभर विव्देषाचे आणि समाजातील शेवटच्या घटकांचे हक्क, अधिकार, आरक्षण,
निधी हिरावले जात आहेत. या पार्श्वभुमीवर एक बाब प्रकर्षाने सांगावी वाटते. दिलीपरावजी
देशमुख जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, तेव्हा जिल्हा परिषद राज्यात प्रथम आली होती. यामध्ये
ग्रामविकास, पाणीपुरवठा, कृषी, सिंचन, महिला व बालकल्याण, शिक्षण या गोष्टी महत्वाच्या
ठरल्या होत्या. मात्र यामध्ये विकासापासून वंचीत असलेल्या वस्तीत विकास योजना नेण्याच्या
एक सामाजिक न्यायाचे पाऊल म्हणून त्यांच्या उपक्रमाची राज्यात सर्वांनी दखल घेतली होती.
लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. लातूर मध्ये
क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, यासाठी लातूर जिल्हा क्रीडा संकुलमध्ये
सुविधा उभारल्या, खेळाडूंसाठी विविध स्पर्धा भरवल्या, विधिमंडळातील कामकाज, स्थानिक
स्वराज्य संस्थांतील कामकाज, सहकार आणि साखर उद्योगातील कामकाज, राज्याच्या
सभागृहातील कामकाज एक लोकप्रतिनिधी म्हणून ते खऱ्या अर्थाने नावारूपाला आले.
आदरणीय दिलीपराव देशमुख यांची विचारसरणी, कारकीर्द, कार्यपध्दती एखादया
चित्रकाराला भावली तर तो आपल्या शेतीला कुंपण घालून, बहरात आलेला ज्वारीचा वावर हातात
गोफनगुंडा घेऊन आटोळयावर उभा राहून राखण करणारा शेतकऱ्या प्रमाणे कर्तव्यदक्ष नेता असे
तो चित्र रेखाटेल. प्रतिकूल परिस्थितीत सहकार, साखर उदयोग, विविध संस्थाची उभारणी, विविध
क्षेत्रात विधायक काम उभा केले. विकासात्मक कार्य रूजवल, वाढवल आणि अपप्रवृत्ती पासून
राखल आणि ते नव्या सक्षमपिढीच्या हातात सुपूर्द केल. असे लोकविलक्षण नेतृत्व दिलीपरावजी
देशमुख याचा आज १८ एप्रिल रोजी वाढदिवस या निमीत्ताने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा…!
वित्त्ा नाही खिशाला
विहीर कोरडी शेतीला.
पीक नाही वावराला
काळोख दारिद्रयाचा घराला.
पाणी आडवल शिवार नदीला
बॅक सुलभ पाठवली सेवेला.
समृध्दी फुलली कष्टानी लातूरला
वंदन करूया आपल्या नेतृत्वाला.
लेखक : राहूल हरिभाऊ इंगळे-पाटील