राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 8 एप्रिलरोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, असा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यानेच ही माहिती दिल्याचे यासंबंधीच्या बातमीत म्हटले आहे. त्यानंतर आज अजित पवार यांचे पुण्यातील कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे अजित पवार भाजपमध्ये जाणार का? अजित पवारांच्या मनात नेमके शिजतेय तरी काय?, या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
शहांसोबत खातेवाटपाचीही चर्चा?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाविरोधात निकाल दिल्यास सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. अशात अजित पवारांना भाजपाबरोबर जात मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, असा दावा या वृत्तपत्रात करण्यात आला आहे. तसेच, दिल्लीला जाण्यासाठी अजित पवारांनी चार्टर्ड विमानाचा वापर केला होता. अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या 35 ते 40 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे अमित शहांसोबतच्या बैठकीत संभाव्य मंत्रीपदाच्या खातेवाटपाबाबतही चर्चा झाली आहे, असे वृत्तपत्रात म्हटले आहे.
अजित पवारांचे नियोजित कार्यक्रम रद्द
एकीकडे अजित पवार यांच्याबाबत संशयाचे वातावरण असतानाच आज पुण्यातील अजित पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आज सासवड येथे अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला अजित पवार आले नाहीत. तसेच, आज सकाळी 8 वाजेपासून वडकी, फुरसुंगी या भागातील काही दुकानांचे उद्घाटन अजित पवार करणार होते, त्या ठिकाणीही अजित पवार आलेले नाहीत त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
अजित पवारांऐवजी शरद पवारांची हजेरी
आज सासवड येथील मेळाव्याला अजित पवार यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे अचानक समजल्याने नागरिकांमध्येही वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार होता. शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नव्हते. परंतु शरद पवारांनी अचानक येणार असल्याचे सांगितले आहे.
अजित पवारांचे असे होते आजचे कार्यक्रम
सासवड येथील मेळाव्यानंतर अजित पवार हे सोमवारी सकाळी 9.30 वाजता वडकी येथे अविनाश कैलास मोडक आणि शिलाताई अविनाश मोडक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार होते. त्यानंतर दिवे (श्री कातोबा हायस्कूल) येथे पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या बैठकीला अजित पवार हजेरी लावणार होते. सकाळी सव्वा दहा वाजता दिवे येथून मोटार सायकल रॅली करून वनपुरी येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे अजित पवार उद्घाटन करणार होते. त्याचवेळी नळ पाणी पुरवठा योजनेचे भुमीपूजन करून पावणे अकरा वाजता भिवरी येथे साठवण बंधाऱ्याचे व जोड रस्त्याच्या कामाचे भुमिपूजन ते करणार होते. त्यानंतर हॉटेल आमराई 69 रिसॉर्टचे उद्घाटन होणार होते. सकाळी साडे अकरा वाजता सासवड पालखी मैदान येथे अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शेतकरी व युवक मेळावास ते उपस्थित राहणार होते.
भाजपकडून ईडीचा वापर- संजय राऊत
दरम्यान, अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाष्य केले. संजय राऊत म्हणाले, भाजप ईडीचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर दबाव टाकत आहे. शिवसेना फोडल्यानंतर महाराष्ट्रात फोडाफोडीचे सीझन 2 येणार आहे. लोकशाहीसाठी ही चिंताजनक बाब आहे. मात्र, अजित पवार भाजपसोबत जातील असे वाटत नाही, असे वक्तव्यही संजय राऊत यांनी केले आहे.