• Sun. May 4th, 2025

आमदार अपात्र झाले तरी शिंदे,फडणवीस सरकार स्थिर, अजित पवारांचं मोठं वक्तव्य; बहुमताचं गणितही सांगितलं अजित पवार

Byjantaadmin

Apr 16, 2023

नागपूर, 16 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अजित पवार हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र आता अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. जरी 16 आमदार अपात्र झाले तरी देखील सरकार स्थिर राहील असा अप्रत्यक्ष दावाच त्यांनी केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी 16 आमदार अपात्र जरी झाले तरी सत्ताधारी पक्षाकडे कसं बहुमत राहिल याचं गणितच मांडलं आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

यावेळी बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, अपक्ष धरून भाजपकडे 115 आमदार आहेत. 106 त्यांचे आणि नऊ अपक्ष. एकनाथ शिंदेसोबत गेलेले 40 आमदार, 10 अपक्ष आमदार थोड्यावेळ बाजूला ठेवले तरी दोघं मिळून 155 आणि 10 अपक्ष असे 165 आमदार सध्या सरकारकडे आहेत. त्यामळे जरी 16 आमदार अपात्र झाले तरी देखील सरकारकडे बहुमताचा आकाड कायम राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे

सभेत भाषण न करण्यावर स्पष्टीकरण

दरम्यान आज नागपुरात होणाऱ्या मविआच्या सभेत अजित पवार हे भाषण करणार नसल्याचं समोर आलं आहे. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे. आम्ही महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांनी बसून ठरवलं होतं की राज्यात सहा ते सात सभा घ्यायच्या. त्याची सुरुवात मराठवाड्यातून झाली. आज नागपूरमध्ये दुसरी सभा आहे. सभांना घेऊन माध्यमं विविध बातम्या चालवत आहेत. पण सगळी माहिती घेऊन बातम्या चालविल्या तर बरं होईल, एका सभेत प्रत्येक पक्षाचे दोनच मान्यवर भाषण करतील असं आधीच ठरलं होतं. त्यामुळे नागपुरच्या सभेत जयंत पाटील आणि अनिल देशमुख बोलणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *