कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत नाव नसल्याने शेट्टार तीन दिवसापासून नाराज होते, अखेर त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आपण विधानसभा सदस्य पदाचा पण राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा विश्वेश्वर हेगडे यांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजीनामा देताना मला वेदना होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. भाजपच्या काही नेत्यानी मी राजीनामा द्यावा, अशी परिस्थिती पक्षात निर्माण केली होती, असा आरोप शेट्टार यांनी केला आहे. भाजपमधील योगदान, VIDHANSABHA अध्यक्षपदासह अन्य प्रमुख पदांवरील दिलेले योगदान यांची आठवण शेट्टार यांनी यावेळी पक्षश्रेष्ठींना करुन दिली.
“राज्यातील पक्षश्रेष्ठींनी मला कधी समजून घेतलं नाही. माझा अपमान करण्यात आला. त्यामुळे मी नाराज होतो. मी आता शांत बसणार नाही. त्यांनी मला आव्हान दिले आहे. ते मी स्वीकारणार आहे,” असे शेट्टार म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे ते निवडणूक लढविणार असल्याची शक्यता आहे.पक्षातील काही नेत्यांनी माझ्या कुटुंबियांतील एका सदस्याला उमेदवारी देण्याचा प्रस्ताव दिला होता, पण हा प्रस्ताव मी फेटाळून लावला. याबाबत मी नंतर सविस्तर माहिती देईल, असा गौप्यस्फोट शेट्टार यांनी केला आहे
राजकीय सुडबुद्धीने माझे तिकीट नाकारले आहे, यामागे मोठे राजकारण आहे. KARNATAKA भाजप वाढविण्यात माझे योगदान मोठे आहे. माझी उमेदवारी नाकारुन पक्षाने मला दुःखी केले असून माझा अपमान केला आहे. भाजपने आत्तापर्यत दोन उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. यात २१२ जणांची नावे आहेत. अजून १२ उमेदवारांच्या नावांची घोषणा करणे बाकी आहे. १० मे रोजी निवडणूक होत असून १३ मे रोजी निकाल लागणार आहे