नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात येत्या मे महिन्यात फेरबदल होण्याचे संकेत मिळत असून तब्बल बारा किंवा त्यापेक्षा जास्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो. पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फेरबदलात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातून शिंदे गटाला तीन मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. त्यात एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मोदी सरकारला येत्या मे महिन्यात नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. एकीकडे नऊ वर्षे पूर्ण होत असताना आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याचे आव्हानही सरकारपुढे आहे. तत्पूर्वी मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि जम्मू काश्मीर या पाच राज्यांत निवडणुका होत आहेत. त्यामुळे हा फेरबदल करताना या राज्यांतील गरज पाहून केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक संधी दिली जाऊ शकते.
बहुतांश मंत्र्यांना वयाचे कारण देऊन केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो. ज्यांनी वयाची ६५ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात येऊ शकतो. कामगिरीच्या आधारावरही काही मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो. काही मंत्र्यांवर भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक जबाबदारी देण्याची चर्चा सुरू आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे कोणाला संधी देतात आणि कोणाला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढतात, हे पहावे लागणार आहे.
दरम्यान, शिवसेनेत बंड उभारून भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन करणाऱ्या शिंदे गटालाही केंद्रात संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाला तीन मंत्रिपदे देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपकडून निवडणुकीच्या तोंडावर आणखी ऊर्जा देण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला केंद्रात एक कॅबिनेट, तर दोन राज्यमंत्रीपदे मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
केंद्रीय मंत्रीपदासाठी शिंदे गटाकडून पहिल्यापासून बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. आता गजानन किर्तीकरही पक्षात सामील झाले आहेत. त्यांच्या संसदीय नेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे, त्यामुळे कीर्तिकर यांना पुन्हा मंत्रिपदी संधी दिले जाते की इतरांना संधी दिली जाते, हे पाहावे लागणार आहे. प्रतापराव जाधव यांच्याबरोबर मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार राहुल शेवाळे यांचीही नावे चर्चेत आहेत.