मुंबई : भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये आगामी निवडणुकांमध्ये आघाडीसाठी चर्चा होण्याची सूत्रांची माहिती आहे. आंबेडकर यांचे हैदराबाद येथे बीआरएस पक्षाच्या नेत्यांनी स्वागत केल्याचे वंचित आघाडीमधील नेत्यांनी सांगितले.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांपासून चार हात दूर राहून सशक्त राजकीय पर्याय देण्याचा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी नांदेडसह मराठवाडा भागात बीआरएस पक्षसंघटनेची बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. याआधी के. चंद्रशेखर राव यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी आणि माजी खा. छत्रपती संभाजीराजे यांचीही भेट घेतली आहे. आता आंबेडकर यांच्याशी आगामी आघाडीबाबत चर्चा करण्याची शक्यता असल्याचे समजते.
नांदेड येथील जाहीर सभेनंतर बीआरएस पक्षाची प्रचार वाहने राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात वाहने फिरविली जाणार असल्याचेही कळते. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेतील अनेक नेते विविध राजकीय पक्षात दाखल झाले असून, काहींनी वेगळ्या शेतकरी संघटना निर्माण केल्या आहेत. अशी मंडळीही तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बाजूने आहेत, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते.