• Sun. May 4th, 2025

…तर शिवानी वडेट्टीवारांना माफी मागायला लावू-नाना पटोले

Byjantaadmin

Apr 15, 2023

प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव आणि माजी मंत्री विजय विडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आल्या आहेत. सावरकर यांच्या मुद्द्यांवर काँग्रेस आणि भाजपात धुमश्चक्री सुरू असतानाच शिवानी वडेट्टीवारांनीही सावरकरांविरोधातील भूमिका उघडपणे मांडल्याने पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. यातच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही आज या वक्तव्याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शिवानी वडेट्टीवार काय म्हणाल्या होत्या?

“हे लोक फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाहीत. ते सावरकर मोर्चा काढतात. मला आणि माझ्यासह इतर भगिनी महिलांना भीती वाटत असेल. सावरकर म्हणायचे बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. ते तुम्ही तुमच्या विरोधकांच्या विरोधात वापरलं पाहिजे. मग माझ्यासारख्या महिला-भगिनींना सुरक्षित कसं वाटेल? अशा लोकांच्या प्रचारासाठी हे लोक मोर्चा काढतात”, असं शिवानी वडेट्टीवार चंद्रपूरच्या एका कार्यक्रमात म्हणाल्या. शिवानी यांनीच हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवरून पोस्ट केला आहे.

नाना पटोलेंची प्रतिक्रिया काय?

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. ते उत्तम लेखक आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी या गोष्टी लिहून ठेवल्या असतील आणि त्यातीलच एका वाक्य उचलून शिवानी वडेट्टीवारांनी मांडलं असेल तर त्याला विरोध करायचं कारण नाही. परंतु, समजा सावरकरांनी लिहिलं नसेल आणि शिवानी वडेट्टीवारांनी ते मांडलं असेल तर निश्चितपणे त्यांना माफी मागायला लावू, असं NANA PATOLE म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

सात्यकी सावरकरांचा वडेट्टीवारांवर हल्लाबोल

“शिवानी वडेट्टीवार यांनी केलेलं विधान अत्यंत चुकीचं आहे. सावरकरांनी असं कुठलंही वाक्य ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात लिहिलेलं नाही. त्यांनी ते विधान मला दाखवावं. असं कोणतंच वाक्य पुस्तकात नाही. सहा सोनेरी पाने पुस्तक मी वाचलेलं आहे,” असं सात्यकी सावरकर यांनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले की, “मुद्दाम टार्गेट केलं जात आहे. एकतर यांनी अभ्यास केलेला नाही. पूर्ण वाचलेलं नाही. यांचं सल्लागार मंडळ यांना सांगतं की सावरकरांनी एकेठिकाणी असं असं लिहिलेलं आहे, तेव्हा हे स्वतः पडताळूनही पाहत नाहीत”, अशी टीका सात्यकी सावरकर यांनी केली.

विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया काय?

“हा विषय फार गंभीर आहे असं मला वाटत नाही. मी शिवानीला विचारलं की हा कुठला संदर्भ घेऊन तू बोललीस. ती म्हणाली सावरकरांनी लिहिलेलं ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातला संदर्भ ती सांगत होती. ती पुस्तकाचा आधार घेऊन बोलली असेल, तर त्यावर वाद होण्याचं काही कारण नाही. पण मला माहिती नाही की ती कोणत्या संदर्भात बोलली आहे. ती स्वत: वकील आहे. त्यामुळे तिला वाचनाचाही मोठा छंद आहे. कुठल्यातरी पुस्तकाचा तिने संदर्भ घेतलाय असं तिचं मत आहे. यावर ती अधिक बोलू शकेल”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *