लातूरात दरोडा; रोख दोन कोटींसह किलोभर सोने लंपास
लातूर : कातपूर राजकुमार अग्रवाल यांच्या घरी बुधवारी पहाटेच्या दरोडेखोरांनी लूटमारकरीत तब्बल दोन कोटीची रोकड व एक किलो सोने लंपास केले. विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत कव्हा नाका रिंग रोड परिसरातील कन्हैया नगरात ही घटना घडली
दरोडेखोरांच्या या टोळीत पाच जणांचा समावेश असून हे दरोडेखोर २५ – ३० वयोगटातील तरुण आहेत. पहाटे अग्रवाल यांच्या घरी जबरी प्रवेशकरीत दरोडेखोरांनी पिस्टल, कोयता, चाकूचा धाक दाखवून नगदी दोन कोटी व एक किलोपेक्षा अधिक सोने लुटल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी दरोडेखोरांच्या शोधासाठी चारही दिशांना पोलिस पथके रवाना केली आहेत. घटनास्थळावरून पोलिस श्वान पथकाद्वारे दरोडेखोरांचा मागोवा घेत आहेत. हे दरोडेखोर मराठीत संवाद साधत होते. त्यामुळे दरोडेखोर आसपासच्याच गावातील असावेत आणि त्यांना पाळत ठेवून हा दरोडा घातला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
सुदैवाने यात अग्रवाल कुटुंबातील कोणालाही इजा झालेली नाही. याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अद्याप फिर्याद दाखल झालेली नसल्याने दरोड्यात नेमका किती ऐवज लंपास झाला, हे मात्र अधिकृतरित्या कळालेले नाही. मात्र दरोडा पडल्याच्या वृत्ताला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी दुजोरा दिला आहे.