राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. जामीन रद्द करण्यास नकार देताना, हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही असे सर्वाेच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे त्यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय. त्यांना हायकोर्टाने जामीन दिल्यानंतर ईडी जामीन मिळू नये यासाठी सुप्रीम कोर्टात गेली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांना इथेही दिलासा दिला असून ते थोड्याच दिवसात तुरुंगाबाहेर येऊ शकतात.
सुप्रीम कोर्टाच्या दिलास्यानंतर आता सीबीआय न्यायालयातही त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे गेली 11 महिले तुरुगांत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख येत्या काही दिवसात बाहेर येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
खासगी रुग्णालयात अँजिओग्राफी
मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना येथील विशेष न्यायालयाने सोमवारी मुंबईतील खासगी रुग्णालयात कोरोनरी अँजिओग्राफी करण्याची परवानगी दिली. देशमुख (71) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती आणि नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने जामीनही मंजूर केला आहे.
हायकोर्टाकडून जामीन मंजूर
सक्तवसुली संचालनालयाने देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणातील ट्रस्टमधील दोन आर्थिक व्यवहारांवर आक्षेप घेतला होता. मात्र, हे दोन घटक गुन्हेगारीचे उत्पन्न नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक झाली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल आहे. न्या. एन. जे. जमादार यांनी देशमुख यांना 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.