महात्मा बसवेश्वरांचा पुतळा वाचविण्यासाठी खासदार-आमदारांनी पुढे यावे-प्रा.सुदर्शनराव बिरादार
लातूर ः लातूर येथील महात्मा बसवेश्वर चौकात उभा असलेला महात्मा बसवेश्वरांचा आश्वारूढ पुतळा हलविण्याच्या हालचाली होत असल्याची चर्चा होत असल्याने हा पुतळा आहे त्या जागेवरून हटवू नये म्हणून समाजबांधव आक्रमक पावित्र्यात आहेत. पुतळा आहे तेथेच ठेवावा. तो इतरत्र हालवू नये या मागणीला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने हा पुतळा वाचविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदारांनी प्रयत्न करावेत असे आवाहन लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी केले आहे.
रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे रोडचे काम लातूर शहरात चालू आहे. राष्ट्रीय महामार्गात कसलेही अडथळे नसावेत म्हणून महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समाजबांधवांना कळताच समाजात खळबळ माजली आहे. खरंतर राष्ट्रीय महामार्ग हा कुठेही शहराच्या मधून जात नाही. राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक व शहरातील वाहतुक यातून निर्माण होणार्या समस्या महामार्ग निर्माण करताना लक्षात घेतल्या नसल्याचे बोलले जात आहे. हा महामार्ग गावाच्या बाहेरून जाणे आवश्यक होते. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा व स्व.राजीव गांधींचा पुतळा हटविण्यात येणार्या असल्याच्या हालचाली सुरू आहेत. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवितांनाही 1990-1991 साली खुप मोठे राजकारण झाले. त्याची पुर्नरावृत्ती होत असल्याची शंका आहे. 1990-1991 साली लिंगायत समाज बांधवांच्या ज्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्याच्या जखमा आजही समाजाच्या मनात ताज्या आहेत. म्हणून महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हाटवत असल्याच्या बातमीने लिंगायत समाज व्यथीत झाला असून पुतळ्यावर राजकारण करण्याची कोणालाही संधी मिळू नये व लिंगायत समाजाच्या भावनाही दुखावल्या जावू नयेत म्हणून जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी, खासदार-आमदारांनी पुढाकार घेवून प्रशासनाला समाजाच्या भावनांची जाणीव करून द्यावी व महात्मा बसवेश्वरांचा पुतळा जैसे थे ठेवून समाजावर होणारा अन्याय थांबवावा अशी विनंती सर्वपक्षीय खासदार-आमदारांना लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी केली आहे.
महात्मा बसवेश्वरांचा पुतळा वाचविण्यासाठी खासदार-आमदारांनी पुढे यावे-प्रा.सुदर्शनराव बिरादार
