• Thu. Aug 14th, 2025

मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी शेतकऱ्यांना दिलासा

Byjantaadmin

Apr 10, 2023

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी

शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई, दि. १०: राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला.

दि.४ ते ८ मार्च व दि.१६ ते १९ मार्च, २०२३ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मार्चमधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मादविण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला.

महसुली विभागनिहाय वितरीत करण्यात आलेला निधी असा: अमरावती विभाग २४ कोटी ५७ लाख ९५ हजार, नाशिक विभाग ६३ कोटी ९ लाख ७७ हजार, पुणे विभाग ५ कोटी ३७ लाख ७० हजार, छत्रपती संभाजी नगर ८४ कोटी ७५ लाख १९ हजार. एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *