• Thu. May 1st, 2025

करकोचांच्या शिकारीमुळे मनाला वेदना; जतन, संवर्धन, संरक्षण करा_आमदार धिरज देशमुख

Byjantaadmin

Apr 10, 2023

मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाणथळ क्षेत्रात असलेल्या रंगीत करकोचा पक्ष्यांच्या वसाहतीत शिकारीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने करकोचा पक्ष्यांच्या वसाहतीचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्याबाबत तातडीने कार्यवाही करून निसर्गाचे हे वैभव जपावे, अशी मागणी ‘लातूर ग्रामीण’चे आमदार धिरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी केली.

मसलगा तलावाच्या पाणथळ क्षेत्रात शिरून काहींनी ७ पिलांची शिकार केली. या घटनेत अनेक पक्षी जखमीसुद्धा झाले आहेत.रविवारी (ता. ९) सकाळी घडलेल्या या अतिशय धक्कादायक घटनेची धिरज देशमुख यांनी त्वरित दखल घेतली. याबाबत वन विभागातील अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून त्यांना योग्य त्या सूचना केल्या.तसेच, या घटनेत प्रसंगावधान दाखवल्याबद्दल ग्रामस्थांचे त्यांनी कौतुकही केले.

काही महिन्यांपूर्वी करकोचा पक्ष्यांच्या वसाहतीची धिरज देशमुख यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून या वसाहतीचे जतन व संवर्धन करावे, अशी मागणी त्यांच्याकडे केली होती. येथे शिकारीसारख्या घटना टाळण्यासाठी आणि ही वसाहत सुरक्षित राहण्यासाठी जतन, संवर्धन व संरक्षणाबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, अशी विनंती वनमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे देशमुख यांनी पुन्हा एकदा केली आहे.

दरम्यान, मसलगा तलावाच्या पाणथळ क्षेत्रात असलेली रंगीत करकोचा पक्ष्यांची वसाहत ही अतिशय दुर्मिळ वसाहत आहे. घरटी असलेली पक्ष्यांची ही वसाहत मराठवाड्यातील पहिलीच वसाहत असून येथे सुमारे २५० रंगीत करकोचा हे त्यांच्या ४०० पेक्षा अधिक पिलांसह वास्तव्य करीत आहेत. ही वसाहत म्हणजे निसर्गाचे वैभव आहे. हे सर्वांनी एकत्र येवून जपले पाहिजे. मात्र, या वसाहतीत झालेली शिकारीची घटना मनाला वेदना देणारी आहे, अशी भावना देशमुख यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *