सांगलीतील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी त्यांना मध्येच थांबवल्याचे पाहायला मिळाले. हा जयंतीचा कार्यक्रम आहे प्रचाराचा नाही, असे म्हणत सतीश चव्हाण यांनी कराडांच्या भाषणबाजीवर नाराजी दर्शवत टाळ्या वाजवणाऱ्या चंद्रकांत खैरे यांचा हात धरत त्यांनाही थांबवल्याचे पाहायला मिळाले.
14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या कार्यालयाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांनी निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, राष्ट्रवादीचे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण, गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. इम्तियाज जलील कार्यक्रमाला हजेरी लावून परतले.
खैरेंनी कराडांना टाळले
सांगलीत हा कार्यक्रम सुरू असतानाच डॉ. भागवत कराड यांचे भाषण सुरू असताना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचे आगमन झाले. यावेळी कराडांनी भाषण थांबवत खैरेंना हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. मात्र यावेळी चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीचे नेते आमदार सतिश चव्हाण यांच्या बाजूला बसणे पसंत केले.
खुसखुशीत चर्चा
भागवत कराड यांनी सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी उल्लेख आपल्या भाषणात केला. मात्र नंतर केंद्रातील मोदी सरकार कशा पद्धतीने योजनांमार्फत गरिबांना मदत करत आहे. भागवत कराड हे सांगत असताना राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री कराड यांच्या चालू भाषणात खोडा घालत हा जयंतीचा कार्यक्रम आहे. इथे काही प्रचार सुरु नाही, असे म्हणत कराड यांना खडसावले. नेमके याचवेळी टाळ्या वाजवणाऱ्या खैरे यांना देखील चव्हाणांनी टाळ्या वाजवू दिल्या नाही, तेही त्यांचा हात पकडून. या सर्व प्रकाराची खुसखुशीत चर्चा रंगली आहे.