राज्यातल्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी दुःखात असतांना मुख्यमंत्री सगळ्या मंत्री, आमदारांना घेवून अयोध्या दौरा करतायेत. इकडे राज्यातील रयत सुखी नसतांना विमानाने जावून देवदर्शन करणे कितपत योग्य आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी अयोध्या दौऱ्यावर केली आहे.
सरकारने जरी FARMERS वाऱ्यावर सोडले असले तरी आम्ही त्यांच्या बाधांवर जावून त्यांना दिलासा देणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्यांचे अख्खे मंत्रीमंडळ अयोध्या दौऱ्यावर आहे. तर दुसरीकडे राज्याच्या अनेक भागात अवकाळी आणि गारपीटीने शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी CM SHINDE यांच्यावर टीका केली.
दानवे म्हणाले, पश्चिम-पूर्व विदर्भासह नाशिक विभागात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. मराठवाड्यात देखील अवकाळी पाऊस झाला असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महिन्याभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अजून पंचनामे झालेले नाहीत. आधीचे संकट डोक्यावर असतांना आता हे नवीन संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे.