• Wed. Apr 30th, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घेतली बैठक

Byjantaadmin

Apr 9, 2023
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घेतली बैठक
लातूरची परंपरा सलोख्याची, सर्वानी समन्वयांनी कार्यक्रम घ्या, शांतता नांदेल याची दक्षता घेऊ या – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
लातूर, ( जिमाका ) लातूर जिल्हा हा नेहमीच शांतता प्रिय आणि सलोख्यानी राहणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रमजान ईद साजरी करताना अत्यंत शांततेत प्रशासनानी दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरी करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महामानवाचे विचार समाजापर्यंत पोहचविण्यासाठी प्रबोधनाचे कार्यक्रम घेणाऱ्या जयंती समितीचे कौतुक करून इतरांनीही हा आदर्श घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले. ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.
 यावेळी  जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अनिकेतन कदम, लातूर मनपा उपायुक्त मयुरा शिंदेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, भंते फयानंद, मौलाना शौकत साहब, गुन्हे अन्वेषण विभागाचे गजानन भातलवंडे यांच्यासह लातूर शहरातील जयंती समारोह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मिरवणूक मार्गावर असलेले रुग्णालय, धार्मिक स्थळ या ठिकाणी शांतता राखवी, यासाठी जयंती मंडळ संयोजकांनी दक्षता घ्यावी. जयंतीसाठी कोणत्याही प्रशासकीय अडचणी असतील तर महानगरपालिका प्रशासनाकडे जावे. महानगरपालिकेने या कालावधीसाठी मदत कक्ष उघडावा, तिथे विशेष नोडल अधिकारी नेमवावा अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या. समाज माध्यमावर कोणी खोडसाळ संदेश तर वायरल करणार नाही ना यावर जिल्हा पोलीस प्रशासन दक्षता घेत आहे. नागरिकांनी पण याबाबत अधिक दक्षता घ्यावी, असे काही असेल तर तात्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. तसेच मिरवणूक मार्गात वीज विभाच्या तारा असतील तर त्याबाबत महावितरणने लक्ष द्यावे, अशा सूचनाही यावेळी महावितरणला देण्यात आल्या.
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह शांततेत पार पाडावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. सर्व जयंती समारोह समितीच्या पदाधिकारी यांनी पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय ठेवावा. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मिरवणूकीच्या वेळी जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या तरुण कार्यकर्त्याकडून कोणतेही कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी केले. सोशल मीडियाचे मॉनिटरिंग 24 तास सुरु आहे,त्यासाठी कोणीही शांतता भंग होईल असे संदेश पसरविण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस  अधिक्षक यांच्याकडून सांगण्यात आले.
 महानगरपालिकेकडून नेहमी प्रमाणे ज्या सुविधा दिल्या जातात, त्या दिल्या जातील, असे सांगून शहरात कोणीही अनधिकृत बॅनर, होर्डिंग लावू नये असे आवाहनही लातूर महानगरपालिकेच्या उपायुक्त मयुरा शिंदेकर यांनी यावेळी केले.
यावेळी भंते फयानंद, मौलाना शौकत साहब यांनीही प्रशासनाला सहकार्य लाभेल, लातूरची सलोख्याची परंपरा कायम राखली जाईल असे सांगून प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा बोलून दाखविल्या.
यावेळी जिल्हा प्रशासनाने जयंती समारोहाचे तसेच रमजान ईद बाबतही विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे म्हणणे ऐकून घेतले. गुन्हे अन्वेषण विभागाचे गजानन भातलवंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *