निलंगा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा उभारणीत भ्रष्टाचार
आमदारांसह नगर पालिकेवर कारवाई करण्याची पत्रकार परिषदेत अभय साळुंके यांची मागणी
निलंगा ( प्रतिनिधी ) ज्यांनी लिहिलेल्या घटनेमुळे आज आपण अनेक पदे उपभोगतोय अशा महामानव घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीत भ्रष्टाचार करुन निकृष्ट व सदोष पुतळा उभारणे हि गंभीर बाब असल्याने याची उच्चस्तरीय चौकशी करून या कामात कारणीभूत असलेले माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व नगरपालिका प्रशासनावर कारवाई करावी आणि सदोष पुतळा तात्काळ बदलण्यात यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी पत्रकार परिषदेत केली.
निलंगा नगरपालिकेच्या वतीने येथील टाऊन हॉल परीसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. दोन वर्षांपूर्वी सदरील पुतळ्याचा रंग जाऊन मुलामा गळून पडल्याने या ठिकाणी सर्व दलित संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पुन्हा एकदा पुतळ्याच्या रंगाच्या खपल्या गळून पडत असल्याची बाब समोर आल्याने याबाबत संताप व्यक्त करत येथील टाऊन हॉल परीसरात पुतळा कामाच्या चौकशीच्या मागणीसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या अध्यक्ष अॅड जगदिश सुर्यवंशी, काॅग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुधाकर पाटील, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे, वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, महासचिव देवदत्त सुर्यवंशी, विजयकुमार सुर्यवंशी, लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गोविंद सूर्यवंशी, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब सौदागर, गिरीश पात्रे, रोहन सुरवसे अदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाचे सचिव अभय साळुंके म्हणाले की , निलंगा येथे सन २०१९ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येत असतानाच पुतळा सदोष आहे अशी लेखी तक्रार सर्व दलित बांधवांनी दिली होती. त्याची दखल न घेताच पुतळा उभारण्यात आला परंतु दोनच वर्षात २०२१ मध्ये पुतळ्याचा रंग जाऊन त्याचा मुलामा गळून पडल्याचा प्रकार समोर आला. याबाबत आम्ही सर्वांनी आवाज उठवताच रातोरात दुसरा कलर मारण्यात आला. तोही आता निघून जाऊन पुतळ्याच्या खपल्या निघत आहेत. महाराष्ट्र ब्राॅंझचे अनेक महापुरुषाचे पुतळे आहेत त्या पुतळ्याचा साधा रंगही जात नाही. परंतु येथील पुतळ्याच्या मात्र खपल्या निघत आहेत यातून पुतळा उभारणी कामात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. या कामाची चौकशी व्हावी म्हणून धम्मानंद काळे यांनी अनेक तक्रारी आंदोलने केली त्यांच्या तक्रारी वरुन चौकशी समिती नेमण्यात आली परंतु स्थानिक आमदारांच्या दबावाखाली अद्याप त्यांची चौकशी झाली नाही. हि गंभीर बाब असून आम्ही महामानवाचा अपमान सहन करणार नाही. तात्काळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.संभाजी पाटील निलंगेकर , नगरपालिका प्रशासन व मुर्तीकारावर कारवाई करावी अशी मागणी अभय साळुंके करत सदोष पुतळा तात्काळ बदलावा अन्यथा १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनंतर सर्व भीमसैनिकांसह आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला .