छत्रपती संभाजीनगरनंतर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेनंतर आता पुढील सभा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या होम ग्राऊंडवर येत्या १६ एप्रिलला होणार आहे. याचदरम्यान, आघाडीच्या सभास्थळावरुन भाजपमधील स्थानिक नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
BJP थानिक आमदार कृष्णा खोपडे आणि शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्यात महाविकास आघाडीच्या सभास्थळावरुन दोन वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. तसेच भाजपमध्ये महाविकास आघाडीच्या सभा स्थानाबद्दल काय भूमिका घ्यावी याविषयी एकवाक्यता नाही का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याच मुद्द्यांवरुन स्थानिक राजकारण देखील तापण्याची चिन्हं आहेत.
आमदार कृष्णा खोपडे काय म्हणाले?
महाविकास आघाडीच्या सभेसाठी दर्शन कॉलनीचे मैदान देऊ नये असे पत्र भाजपचे स्थानिक आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रशासनाला दिले आहेत. दर्शन कॉलनीच्या मैदानाची मालकी असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासकडून काही निर्णय घेतला जाईल.
यापूर्वीच स्थानिक आमदार कृष्णा खोपडे यांनी त्यासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासकडे पत्र देत दर्शन कॉलनीच्या मैदानात शासकीय निधीतून अनेक क्रीडा सोयी निर्माण करण्यात आल्या असून त्या ठिकाणी राजकीय सभा घेतल्यास त्या क्रीडा सोयी खराब होतील. तसेच नागरिकांनाही त्रास होईल असं सांगितलं.
…तर आम्हाला आक्षेप नाही; दटकेंचं स्पष्टीकरण
तर दुसऱ्या बाजूला भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी मात्र दर्शन कॉलनीच्या मैदानावर महाविकास आघाडीची सभा झाल्यास आम्हाला आक्षेप नाही असं मत व्यक्त केलं आहे.
काँग्रेस पक्षाकडून मैदानाची मागणी…
(Congress) पक्षाने नंदनवन परिसरातील दर्शन कॉलनीचे मैदान निश्चित करत प्रशासनासाकडे मैदान उपलब्ध करुन देण्यासाठी मागणी केली आहे. येत्या 24 तासात काँग्रेस पक्ष नागपुरातील सभेबद्दल स्थान निश्चितीचे अंतिम निर्णय घेणार आहे. नागपुरात अनेक मोठे मैदान उपलब्ध असताना दर्शन कॉलनीचे मैदान तुलनेने खूप लहान आहे. त्यामुळे मैदानावर भरगच्च गर्दी दाखवण्यासाठी काँग्रेस तुलनेने लहान मैदानाच्या शोधात आहे का असाही प्रश्न या वादानंतर निर्माण झाला आहे.