अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंतीनिमित्त अमरावतीमध्ये आयोजित कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे हे पक्ष सांभाळू शकले नाहीत. त्यांना पक्षाची विचारधारा सांभाळता आली नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे देखील अश्रू ढाळत असतील अशा शब्दांत ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर आता ठाकरे गटाकडून राणा यांच्या टीकेच्या खरपूस समाचार घेण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी खासदार नवनीत राणा यांच्या उध्दव ठाकरेंवरील टीकेवर पलटवार केला आहे. कायंदे म्हणाल्या, नवनीत राणांनी पहिल्यांदा आपल्या वडिलांना शोधून काढावे. ते फरार असून, अद्याप पोलिसांना सापडले की नाही, याची माहिती नाही. त्यामुळे स्वत: केलेल्या भानगडी पहिल्यांदा सोडवाव्यात. नंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलावं. उद्धव ठाकरेंबाबत बोलण्याची नवनीत राणांची लायकी नाही असंही कायंदे म्हणाल्या आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणावरुन अटक केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. तेव्हापासून राणा दाम्पत्य व ठाकरे असा संघर्ष नेहमीच पाहायला मिळत आहे. (Navneet Rana) उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. हनुमान जयंती निमित्त कार्यक्रमातही खासदार राणा यांनी ठाकरेंवर निशाणा साधला होता
राणा म्हणाल्या,(Uddhav Thackeray) तुमचा घमंड देवानेच ठेचला., तुम किस खेत की मुली हो? ५६ वर्ष ज्या घराण्यामध्ये तुम्ही जन्माला आले ते घर टिकवू शकले नाही. स्वतः च्या पक्षातले आमदार सांभाळू शकले नाही. विचारधारा टिकवू शकले नाही. ज्या विचारधारेसाठी बाळासाहेबांनी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं ते ते टिकावू शकले नाहीत. महाराष्ट्र काय बाळासाहेब ठाकरेंच्या डोळ्यातही अश्रू असतील त्यांची विचारधारा बुडवण्याचे काम त्यांच्याच मुलानं केलं अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली होती.
तुरुंगातील आठवणी सांगताना भावूक…
नवनीत राणा या तुरुंगातील आठवणी सांगताना चांगल्याच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. राणा म्हणाल्या, ज्या राज्याला संताची भूमी म्हणून ओळखले जाते आहे. त्याच महाराष्ट्रामध्ये ३३ महिन्याच्या सरकारने हनुमान चालीसा पठण केल्यामुळे जेलमध्ये टाकण्यात आले. आम्हाला अधिकार नव्हता का? मुंबईमध्ये पाय ठेवला तर तुम्हाला गाडून टाकू अशी भाषा वापरली गेली. तेव्हा महिला म्हणून मला काय वाटले असेल?
यावेळी त्यांनी मला १४ दिवस तुरुंगात ठेवण्यात आले. त्यानंतर आणखी एक महिना ठेवण्यासाठी हालचाली चालू होत्या. तेव्हा माझी मुलेसुद्धा विचारत होती की, आई तू असे काय केलेस? कशासाठी तुला जेलमध्ये टाकण्यात आले असं सांगत राणा भावुक झाल्या.