महाराष्ट्रात स्वत: शरद पवार करणार राहुल गांधी यांच्या यात्रेचं स्वागत
मोदी सरकारच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात आणि चुकीच्या धोरणांविरोधात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली असून तिचा समारोप श्रीनगरमध्ये होणार आहे. सध्या ही यात्रा तामिळनाडू, केरळमार्गे कर्नाटकात पोहचली असून येत्या नऊ नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलुरमध्ये ही यात्रा पोहचणार असून त्याच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी करणार भारत जोडो यात्रेचं स्वागत…
जेव्हापासून कॉंग्रेसनं भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. तेव्हापासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी या यात्रेवर आणि त्यात सहभागी होण्यावर बोलणं टाळलेलं आहे. परंतु ही यात्रा काढण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधींचं कौतुक केलं होतं. त्यामुळं आता भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर त्याच्या स्वागताला शरद पवार उपस्थित राहण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
ठाकरे गटाचे प्रतिनिधीही राहुल गांधींच्या स्वागतासाठी जाणार?
जेव्हा भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होईल, तेव्हा राहुल गांधींच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे जातील, अशी चर्चा सुरू होती. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे त्यांच्या काही विश्वासू सहकाऱ्यांना राहुल गांधींच्या यात्रेचं महाराष्ट्रात स्वागत करण्यासाठी पाठवू शकतात, असं बोललं जात आहे.
यात्रेचा महाराष्ट्रातील रुट काय आहे?
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटकात आहे. येत्या नऊ नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रातील देगलुरमध्ये दाखल होईल. त्यानंतर ही यात्रा नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यांतून मध्यप्रदेशच्या दिशेनं रवाना होणार आहे. याशिवाय या यात्रेचे राज्यात जळगाव, जामोद आणि नांदेड या ठिकाणी थांबे असणार आहेत.
राहुल गांधींनी का काढली भारत जोडो यात्रा?
२०१४ पासून केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशात धार्मिक विद्वेष वाढल्याची आणि देशात असहिष्णू वातावरण निर्माण झाल्याची टीका नेहमीच कॉंग्रेसनं केलेली आहे. त्यामुळं देशातील लोकांमध्ये सामाजिक सलोखा आणि एकोपा कायम रहावा यासाठी कॉंग्रेसनं ही यात्रा काढली आहे. याशिवाय या यात्रेच्या माध्यमातून कॉंग्रेस बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यांवरही मोदी सरकारविरोधा रान पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या यात्राला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.