मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Bypoll) शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी एकत्रितपणे ताकद लावणार आहे. ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नव्या नावासह आणि ‘मशाल’ या नव्या निवडणूक चिन्हासोबत ठाकरे रिंगणात उतरत आहेत. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना ५० हजारांच्या मताधिक्याने निवडून आणू, असा शब्द काँग्रेस नेत्यांनी दिला. तर दुसरीकडे भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटल्याची माहिती आहे. पक्षात अनेक इच्छुक असताना आयाराम नेत्याला तिकीट देण्याच्या हालचाली सुरु असल्यामुळे भारतीय जनता पक्षातही धुसफूस असल्याचं बोललं दात आहे.
भाजपात नाराजीचा सूर
अंधेरी पूर्व मतदारसंघासाठी भाजपकडून इतर पक्षांतून आयात केलेले मुरजी पटेल यांना संधी दिली जाणार आहे. मात्र या निर्णयामुळे काही इच्छुक माजी नगरसेवक नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच भाजपकडून उमेदवाराची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ही नाराजी दूर करण्याची जबाबदारी भाजपच्या अनेक नेत्यांवर सोपवण्यात आली आहे, अशी माहितीही पुढे आली आहे.
कोण आहेत मुरजी पटेल?
भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. मुरजी पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. अंधेरी भागात त्यांनी जीवनज्योत प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलं आहे. मुरजी पटेल यांच्या पत्नी केशरबेन २०१२ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेविका होत्या. २०१५ मध्ये पटेल दाम्पत्याने काँग्रेस सोडून भाजपचा झेंडा हाती धरला. त्यानंतर २०१७ ची महापालिका निवडणूक जिंकली, मात्र २०१८ मध्ये बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात दोघांचंही नगरसेवक पद रद्द झालं होतं.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांची निवडणूकपूर्व युती असल्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. यामुळे नाराज झालेल्या पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन केल्यामुळे ही खरंच बंडखोरी आहे की पक्षाच्या संमतीने अपक्ष लढवलेली निवडणूक, असा सवालही विचारला जात होता.