• Tue. Apr 29th, 2025

धीरेंद्र शास्त्रींनी साईबाबांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवारांनी केलं भाष्य

Byjantaadmin

Apr 3, 2023

गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री आपल्या विधानांमुळे चर्चेत आहेत. अलीकडेच संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. अशातच धीरेंद्र शास्त्रींनी शिर्डीचे साईबाबा यांना देव मानण्यास नकार दिला. धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

धीरेंद्र शास्त्रींनी नेमके काय म्हटले होते?

जबलपूर येथे धीरेंद्र शास्त्रींनी भाविकांशी संवाद साधला. त्यावेळी एका भाविकाने साईबाबांची पूजा केली पाहिजे की नाही, असा सवाल धीरेंद्र शास्त्रींना विचारला. त्यावर “लांडग्याचे कातडे पांघरून कोणी सिंह होत नाही,” असं उत्तर धीरेंद्र शास्त्री यांनी दिलं.

“शंकराचार्यांनी साईबाबांना देवाचे स्थान दिलेले नाही. शंकराचार्यांचे मत हे बंधनकारक आहे. शंकराचार्य हे सनातनी धर्माचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे प्रत्येक सनातनी धर्माने त्यांचे ऐकले पाहिजे. कोणतेही संत असतील, मग ते आपल्या धर्माचे का असेना, ते देव होऊ शकत नाहीत. गोस्वामी तुलसीदास किंवा सूरदास असो, हे सर्व संत आहेत. काही महापुरुष आहेत, काही युगपुरुष आहेत, तर काही कल्पपुरुष आहेत. पण, यात देव कोणीही नाही,” असं धीरेंद्र शास्त्रींनी म्हटले.

“आम्ही कोणाच्याही भावनेचा अवमान करत नाही. साईबाबा संत असू शकतात. फकीर असू शकतात. मात्र, ते देव होऊ शकत नाही,” असेही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले?

धीरेंद्र शास्त्रींनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला, याबद्दल मुंबईत पत्रकारांनी विरोधी पक्षनेते AJIT PAWAR यांना प्रश्न विचारले. त्यावर “या बाबा लोकांचे जास्त ऐकू नका. हे भोंदूबाबा आहेत,” असे अजित पवारांनी म्हटले आहे.

“एखाद्याच्या श्रद्धेवर चिखलफेक करण्याचा अधिकार कोणाला दिला नाही”

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही प्रतिक्रिया देत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. “बाबालोक स्वत: देवाचं रूप घेऊन लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा. हे धार्मिक तेढ निर्माण करत, सामाजिक अशांतता पसरवण्याचं काम करतात. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला आहे. एखाद्याच्या श्रद्धेवर चिखलफेक करण्याचा अधिकार कोणाला दिला नाही,” असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed