• Tue. Apr 29th, 2025

अदानीच्या २० हजार कोटींची चौकशी करा; आजपासून कॉंग्रेसचे मुंबईत आंदोलन

Byjantaadmin

Apr 1, 2023

मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. या प्रश्नी पक्षाने शुक्रवारी राज्यभरात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. अदानी समुहात २० हजार कोटी रुपये शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतविण्यात आल्याकडे लक्ष वेधून या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या प्रश्नावर मुंबई काँग्रेस शनिवारपासून आंदोलन करणार आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, चरणसिंग सप्रा यांच्यासह स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधींनी ही मागणी केली. ‘अदानी समूहाच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी कुठून आले? सर्व देशांचा दौरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानी यांना घेऊन जातात. तिथले कंत्राट त्यांना मिळते. मोदी व अदानी यांचा नेमका संबंध काय, असे प्रश्न देशातील १४० कोटी नागरिकांच्या वतीने राहुल गांधी संसदेत विचारतात. तेव्हा नरेंद्र मोदी व त्यांचे नेते त्यावर भाष्य करत नाहीत, उत्तर देत नाहीत. उलट प्रश्न विचारणाऱ्या राहुल यांचा माइक बंद केला जातो. ही काय हुकूमशाही आहे का,’ असा प्रश्न भाई जगताप यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांच्यावरील अन्यायाविरोधात षडयंत्र करून त्यांची खासदारकी रद्द केल्याविरोधात मुंबई काँग्रेसतर्फे १ एप्रिलपासून मुंबईतील २२७ वॉर्डांमध्ये आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

राष्ट्रपतींना पोस्टकार्ड पाठविणार

१ एप्रिलपासून होणाऱ्या आंदोलनादरम्यानच राहुल गांधी यांनी संसदेत विचारलेले नागरिकांचे प्रश्न पोस्टकार्डवर लिहिले जाणार आहेत. नंतर सर्व पोस्टकार्ड एकत्र करून देशाच्या राष्ट्रपतींना पाठवली जाणार आहेत. या पोस्टकार्डच्या माध्यमातून राष्ट्रपतींना आम्ही राहुल गांधी यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत जाब विचारणार आहे, असे भाई जगताप यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed