मुंबई: हिंडेनबर्ग अहवालानंतर प्रचंड मोठा आर्थिक फटका बसलेल्या अदानी समुहाकडून गेल्या काही दिवसांमध्ये महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. अदानी समूहातील काही कंपन्यांची मुंबईत असलेली मुख्यालये ही गुजरातच्या अहमदाबाद येथे हलवण्यात आली आहेत. यामध्ये एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांची मुख्यालये गुजरातला गेल्याने आता अनेक महत्त्वाचे प्रशासकीय आणि धोरणात्मक निर्णय तिथूनच घ्यायला सुरुवात झाली आहे. परंतु, कंपनीचे सीईओ अजय कपूर हे अद्याप मुंबईतच आहेत. यामुळे अंबुजा आणि ACC या कंपन्यांमध्ये दोन प्रशासकीय केंद्रे तयार झाली आहेत. परिणामी कंपन्यांचा कारभार सांभाळताना आणि निर्णय घेताना बराच गोंधळ उडताना दिसत आहे.
अदानी समूहाने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ६.५ अब्ज डॉलरला एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांची खरेदी केली होती. तेव्हा या कंपन्यांची मुख्यालये मुंबईत होती. मात्र, हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर शेअर बाजारात झालेली पडझड आणि चौकशीच्या संभाव्य ससेमिऱ्यामुळे अदानी समूहान काही कंपन्यांची मुख्यालये मुंबईहून गुजरातमध्ये नेली आहेत. कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिकारी हे अहमदाबादमध्ये आणि त्यांचे कनिष्ठ अधिकारी मुंबईत अशी स्थिती आहे. कामकाजासाठी त्यांना वारंवार मुंबई आणि अहमदाबाद अशा चकरा माराव्या लागत आहेत. या त्रासाला अनेक कर्मचारी कंटाळले आहेत. गुजरातमध्ये जाण्याच्या मनस्थितीत नसलेल्या कर्मचाऱ्यांनी दुसरीकडे नोकऱ्या शोधण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. यामध्ये मुख्यत्वेकरुन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे सतत मुंबई-अहमदाबाद अशा येराझारा मारणे या महिला कर्मचाऱ्यांना शक्य नाही. त्याऐवजी अहमदाबाद येथेच कायमस्वरुपी वास्तव्य करणे हा एक पर्याय आहे. मात्र, त्यापूर्वी हे कर्मचारी दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळेल का, याची चाचपणी करत आहेत.