काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने आणि अदानी (adani group) प्रकरणी जेपीसीच्या मागणीवरून लोकसभेत आजही गोंधळ सुरूच आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर आज राहुल गांधी हे संसदेत पोहोचले आहेत. राहुल गांधी सीपीपी कार्यालयात लोकसभा आणि राज्यसभेच्या काँग्रेस खासदारांच्या बैठकीत सामील होतील.
Rahul Gandhi: संजय राऊत यांची घेतली भेट 
याच दरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वा. सावरकर वादावरून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची बुधवारी राऊत यांच्याशी भेट झाली. यानंतर सर्व काही ठीक आहे आणि काळजी करण्यासारखे काही नाही, असे राऊत म्हणाले.
Rahul Gandhi: काळजी करण्यासारखे काहीच नाही – संजय राऊत
संसद भवनात राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट झाली. या भेटीनंतर राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. ज्यात ते म्हणाले आहेत की, ”सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची आज भेट घेतली. अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. सर्व काही ठीक आहे. काळजी करण्यासारखे काहीच नाही.” संजय राऊत मंगळवारी म्हणाले होते की, त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्याशी संवाद साधताना सावरकरांचा मुद्दा उपस्थित केला होता आणि महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये या विषयावर एकमत आहे.
तत्पूर्वी, राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेवरून विकास आघाडी (MVA) आघाडीत तेढ निर्माण झाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करत काँग्रेस नेतृत्वाला या मुद्द्यावर उद्धव ठाकरे गट नाराज असल्याची माहिती दिली होती.
दरम्यान, 27 मार्च रोजी दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीपासून दूर राहून शिवसेनेनं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न यशस्वी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीत राहुल गांधींनी आता सावरकरांवर वादग्रस्त बोलणार नसल्याचे संकेत दिल्याची माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.