साक्री : राज्यातील सध्याची राजकीय अस्थिरता लक्षात घेतल्यास केव्हाही विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी त्यादृष्टीने तयार राहिले पाहिजे. पक्षाला यश मिळवून द्यायचे असेल तर गावपातळीपर्यंत संघटना मजबूत करावी लागेल. आधी पक्ष मजबूत करा, मग मतदारसंघाची मागणी करता येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. येथील विश्रामगृह सभागृहात झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे, अमळनेर येथील आमदार अनिल पाटील, निरीक्षक अर्जुन टिळे, जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र मराठे आदी उपस्थित होत
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी साक्री विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी मिळावा, अशी मागणी केली. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. कार्यकर्त्यांना हा मतदारसंघ पक्षाकडे असावा, असे वाटते. त्यांच्या भावनांचा विचार केल्यास पक्षवाढीला चालना मिळेल, असा दावा केला.
यावर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी, आधी संघटना मजबूत करा, वेळ आल्यास नक्कीच राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघाची मागणी करेन. सध्या बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आगामी काळात आपल्याला सहकारी पक्षांना बरोबर घेऊन काम करावे लागेल. त्यादृष्टीने आपला पक्ष बुथ स्तरावर मजबुत असल पाहिजे, असे सांगितले.
एकनाथ खडसे यांनी देखील संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. सध्याचे राजकीय वातावरण बघता निवडणुका वेळेआधीच, कधीही लागू शकतात. अशा वेळी कार्यकर्त्यांनी यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
…तर आमदार नक्की होईल
बैठकीत सुरपान येथील शेतकरी गोविंदराव देवरे यांनी पांझराकान सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे केली. या वेळी त्यांनी सांगलीच्या धर्तीवर साक्रीचा कारखाना सुरू केल्यास तालुक्यातून नक्कीच राष्ट्रवादीचा आमदार विजय होऊ शकेल, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. दरम्यान, या वेळी धनगर, ठेलारी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यकारिणीत समाजाच्या प्रतिनिधींना स्थान देण्याची मागणी केली.