थकबाकीवरील व्याज माफी योजनेस नागरिकांचा प्रतिसाद मार्चअखेर कर भरण्याचे मनपाचे आवाहन
लातूर/प्रतिनिधी: थकित करावरील व्याज माफ करण्याची योजना मनपाने जाहीर केली होती.या योजनेस नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.शहरातील असंख्य नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत कर भरला आहे.उर्वरित नागरिकांनीही मार्चअखेर आपल्याकडील कराचा भरणा करावा,असे आवाहन मनपाने केले आहे.
कोविडच्या काळात शहरातील अनेक नागरिकांचा कर थकला होता.विविध अडचणींमुळे नागरिकांना कर भरणे शक्य झाले नव्हते.नागरिकांच्या अडचणी लक्षात घेत मनपाकडून थकबाकीवरील व्याज माफ करण्याची योजना जाहीर केली.
या योजनेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
योजनेचा लाभ घेत असंख्य नागरिकांनी आपल्याकडील कराचा भरणा करत बेबाकी केली.अजुनही नागरिक कराचा भरणा करत आहेत.मार्च महिना संपण्यास आणखी काही दिवस शिल्लक आहेत.ज्या नागरिकांनी अजून कर भरलेला नाही त्यांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत आपल्याकडील कराचा भरणा पालिकेकडे करावा,या कालावधीत कराचा भरणा केला तर कर व्याज माफी योजनेचा लाभ घेता येईल,असे आवाहन मनपा आयुक्त श्री.बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.