beed ;आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. मात्र गौतमीने तीन गाणे वाजवले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा होतो. 200 पोरांचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधे संरक्षण देखील दिले जात नाही, असा आरोप इंदुरीकर महाराजांनी केला आहे.
किर्तनकार इंदुरीकर महाराज हे आपल्या वेगवेगळ्या विधानांनी नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी थेट प्रसिद्ध नृत्यांगणा आणि सध्या तरुणाईमध्ये जिची मोठी क्रेझ आहे अशा गौतमी पाटीलवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. बीडमध्ये एका किर्तनात बोलताना इंदुरीकर महाराजांनी हे वक्तव्य केले आहे.
काही दिवसांपूर्वी वडिलांनी चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या लावणीचे आयोजन केले होते. या वाढदिवसाची मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर एका पठ्ठयाने चक्क बायकोच्या वाढदिवसाला तरुणांच्या हृदयाची धडकन म्हटल्या जाणाऱ्या गौतमीच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कार्यक्रम चक्क एका बैलाच्या वाढदिवशी ठेवण्यात आला होता.
गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात. तिचे मानधनही गब्बर असते. गौतमी पाटीलच्या नृत्याचे व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल झाले होते, यात अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे. नृत्यांगना गौतमी पाटीलचे नृत्य ठेवण्यासाठी राज्यभरातून चढाओढ लागते. तिचा कार्यक्रम म्हटले की, टाळ्या आणि शिट्ट्यांची नुसती बरसात होते. हेच पाहता सध्या वाढदिवसाला डान्स शोचे आयोजन करण्याची चढाओढ होत आहे, याबाबत ट्रेंड सेट होताना दिसून येत आहे.