• Wed. Apr 30th, 2025

‘जल जीवन मिशन’अंतर्गत लातूर जिल्ह्यात 3 लाख 73 हजार कुटुंबांना मिळणार नळजोडणी

Byjantaadmin

Mar 26, 2023

‘जल जीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यात 3 लाख 73 हजार कुटुंबांना मिळणार नळजोडणी

  • दरडोई किमान 55 लिटर पाणी पुरविणार
  • 2024 पर्यंत सर्व कुटुंबांना नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट
  • सुमारे 572 कोटी 27 लाखांच्या 899 योजनांना मंजुरी

लातूर, (जिमाका) : ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना 2024 पर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रतिदिन स्वच्छ पाणी पुरविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 2023-24 साठी 20 हजार कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून लातूर जिल्ह्यातील 572 कोटी 27 लाख रुपयांच्या 899 पाणी पुरवठा योजना 935 गावात मंजूर करण्यात आल्या आहेत. सर्व  कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून आतापर्यंत 64 कामे पूर्ण झाली आहेत.

जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस, स्वयंपाक आणि घरगुती वापरासाठी व पुरेसा आणि शुद्ध, शाश्वत पाणी पुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला कार्यक्षम पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाचा समान निधी उपलब्ध करून देण्यात आला असून राज्याच्या 2023-24 साठीच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी राज्याकरिता सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीस गती मिळणार आहे. या कामासाठी 10 टक्के लोकवाटा ग्रामपंचायतीककडून जमा करावयाचा आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची सुरक्षा देण्यासाठी प्रत्येक घरात कार्यात्मक नळ जोडणीद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. नळ पाणीपुरवठा सोय नसलेल्या आदिवासी गावे, वाड्या, पाडे येथील कुटुंबांना या योजनेंतर्गत कायमस्वरुपी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या सोबतच शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे, अंगणवाडी यांनाही या योजनेतून नळ जोडणी देण्यात येत आहे.

ज्या गावांमध्ये पिण्यायोग्य मुबलक भूजल किंवा अन्य पाणीसाठा उपलब्ध आहे, अशा गावामध्ये स्वतंत्र योजना घेण्यात आल्या आहेत. तसेच ज्या गावांमध्ये मुबलक भूजल किंवा अन्य पाणीसाठा उपलब्ध असूनही पाण्याची गुणवत्ता योग्य नाही, अशा गावामध्ये जल शुद्धीकरणाच्या प्रकल्पासह स्वतंत्र योजना घेण्याची तरतूद या योजनेमध्ये आहे. ज्या गावांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी आहे, अशा गावासाठी प्रादेशिक योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

लातूर जिल्ह्यात 899 योजनांना जल जीवन मिशन अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. त्याची एकूण अंदाजित रक्कम 572 कोटी 27 लक्ष रुपये आहे. या सर्व कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून 64 कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतीपथावर असून याद्वारे 2024 पर्यंत जिल्ह्यातील 3 लाख 73 हजार 839 कुटुंबांना नळ जोडणी दिली जाणार आहे.

तालुकानिहाय मंजूर योजना आणि त्याद्वारे नळजोडणी दिली जाणारी ग्रामीण कुटुंब संख्या पुढील प्रमाणे राहील. अहमदपूर तालुक्यातील योजनांची संख्या 15 असून कुटूंब संख्या 43 हजार 654 एवढी आहे.  औसा तालुक्यातील योजनांची संख्या 126 असून कुटूंब संख्या 57 हजार 989 एवढी  आहे. चाकूर तालुक्यातील योजनांची संख्या 85 असून  कुटूंब संख्या 32 हजार 380 एवढी आहे. देवणी तालुक्यातील योजनांची संख्या 53 असून  कुटूंब संख्या 17 हजार 544 एवढी आहे. जळकोट तालुक्यातील योजनांची संख्या 47 असून  कुटूंब संख्या 17 हजार 285 एवढी आहे. लातूर तालुक्यातील योजनांची संख्या 132 असून कुटूंब संख्या 65 हजार 892 एवढी आहे. निलंगा तालुक्यातील योजनांची संख्या 138 असून कुटूंब संख्या 56 हजार 431 एवढी आहे. रेणापूर तालुक्यातील योजनांची संख्या 71 असून कुटूंब संख्या 24 हजार 846 एवढी आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील योजनांची संख्या 46 असून कुटूंब संख्या 14 हजार 372 एवढी आहे. उदगीर तालुक्यातील योजनांची संख्या 86 असून कुटूंब संख्या 43 हजार 446 एवढी आहे. जिल्ह्यातील एकूण योजनांची संख्या 899 असून जिल्ह्यातील एकूण कुटूंब संख्या 3 लाख 73 हजार 839 इतकी आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 28 योजना;

उदगीर, जळकोट तालुक्यातील 129 तर अहमदपूर तालुक्यातील 18 गावांचा समावेश

 

जीवन प्राधिकरणाकडून जिल्ह्यात मोठ्या 28 योजना असून 857.69 कोटी रुपये एवढा खर्च  अपेक्षित आहे. त्यात एक वॉटर ग्रीड योजना असून त्यात उदगीर, जळकोट तालुक्यातील 129 गावे आहेत. त्यासाठी 480.96 कोटी रुपये अपेक्षित आहे.

लातूर तालुक्यातील महाराणा प्रतापनगर येथे 54.84 कोटींची योजना आहे. अहमदपूर तालुक्यातील 18 गावे यासाठी 45.39 कोटी इतका निधी अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed