मी संसदेत अदानी यांच्या शेल कंपनीमधील 20 हजार कोटी कोणाचे आहेत? माझ्या या साध्या प्रश्नाचे उत्तर भाजप का देत नाही? असा थेट सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. 2019 मधील वक्तव्यानंतर खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गौतम अदानी यांच्या संबंधावरून घणाघात केला. कायमचे अपात्र केले तरी मी प्रश्न विचारणार, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. राहुल गांधी यांनी यावेळी झालेल्या कारवाईवरून कोणतीही वक्तव्य न करता संसदेतील भाषणातील भाजपकडून करण्यात आलेल्या कारवाईचा घटनाक्रम सांगितला. संसदेत अदानी आणि मोदींचा काय संबंध विचारल्यानंतर भाजपने माझ्याविरोधात ओरड सुरु केल्याचे राहुल म्हणाले. मोदी आणि अदानी यांचं नातं नवीन नसल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, अदानी यांच्या शेल कंपनीत 20 हजार कोटी कोणी गुंतवले? तो पैसा कोणाचा आहे? अदानी आणि मोदींचं नात नवीन नाही. मी मुद्देसुदपणे संसदेत अदानीवरून प्रश्न उपस्थित केले होते. त्यासाठी संदर्भही दिले होते. तरीही भाजपच्या मंत्र्यांनी माझ्याबाबतीत चुकीची माहिती दिली. संसदेत माझ्याबाबतीत खोटे आरोप करण्यात आले. मला प्रश्न विचारू दिले नाहीत. मात्र, प्रश्न विचारणे बंद करणार नाही. माझा तो इतिहास नाही. मी देशाच्या लोकशाहीसाठी लढतोय, घाबरत नाही. अदानी यांच्या कंपनीत 20 हजार कोटी कोणी गुंतवले? त्यामध्ये चीनमधील व्यक्तीचाही सहभाग आहे. खासदारकी रद्द करून मला गप्प करू शकत नाही. अदानीच्या शेल कंपनीत कोणी गुंतवणूक केली हा माझा प्रश्न आहे. मला प्रश्न का विचारू दिले जात नाहीत असं विचारले असता लोकसभा सभापती म्हणतात चला एक चहा घेऊ म्हणतात.